दादा..! भाग- २७

*दादा..!*

*भाग - २७*

  *आकाशवाणी पुणे, सुधा नरवणे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे...* हा आवाज ऐकला नाही असा माणूस ग्रामीण महाराष्ट्रात सापडणार नाही !

  *त्यावेळी आमच्या घरातला सर्वांचा आवडता 'सदस्य'  रेडिओ होता !* सकाळी उठलं की दादा पुणे केंद्र लावून रेडिओ खुंटीला लटकवून ठेवत. सहाच्या आधीची मंजुळ धूनच आम्हाला झोपेतून जागं करी. पुणे केंद्र दादा, आबांच्या खास आवडीचं होतं. सहाच्या हिंदी बातम्यानंतर चिंतन होत असे. *सुप्रभात या भक्तीगीतांच्या कार्यक्रमानं सकाळचं सगळं वातावरण प्रसन्न व्हायचं.* सात वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आवर्जून ऐकल्या जात. सुधा नरवणे यांच्या प्रमाणेच भालचंद्र जोशी यांचा स्पष्ट उच्चार, आवाजातील चढउतारपणा मनाला भावत असे. रेडिओ ऐकत ऐकत सगळ्यांची सगळी कामं गपगुमान चालू असत. 

   दादा, आबा सकाळी आणि संध्याकाळीच रेडिओ ऐकत.

  *संध्याकाळी सहाला 'आमची माती आमची माणसं' हा खास शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम प्रसारित केला जाई. 'चालू जमाना' या कौटुंबिक श्रुतिकेतून समाजमनाचे रंग ढंग दाखवले जात. गौरी लागू, सिद्धार्थ बेंद्रे, प्रतिमा कुलकर्णी अशा काही कलाकारांचे संवाद कौशल्य ऐकतच राहावं, इतकं गोड असे. रविवारी साडेसहाचं कीर्तन जितक्या आत्मीयतेनं ते ऐकत तितक्याच आवडीनं नभोनाट्यही ऐकत.*

आम्हाला मात्र रेडीओवर मराठी, हिंदी गाणी ऐकायला आवडत.

  मला आणि कृष्णाला दादांनी भट्टीची सगळी कामं शिकविली होती. त्यांच्या गैरहजेरीत आम्ही दुधवाल्यांची कधीही तक्रार येऊ दिली नाही. शेतातली छोटी छोटी कामंही आम्हाला जमत. *दादा नेहमी म्हणत, "आपल्याला सगळं करता आलं की दुसऱ्याच्या हाताकडं बघत बसावं लागत नाही."* सुट्टीच्या दिवशी आम्हाला भट्टीची, शेतातली सगळी कामं करावीच लागत.

  विहिरीचं काम नंतर घराचं काम चालू होतं, तेव्हा अनेकदा आम्हाला दुपारची शाळा बुडवावी लागायची. म्हशींना नह्यारात चरायला न्यावं लागायचं, तेव्हा रेडीओ सोबत न्यायला मी विसरत नसे. रविवारी दुपारी साडेबाराची 'आपली आवड' खूप आवडत असे. एकदिवसीय क्रिकेट मॅचची हिंदी /इंग्रजी 'कॉमेंट्री', विविध भारती केंद्रावरचं 'मन चाहे गीत', ऑल इंडिया रेडिओवरची 'आप की पसंद' यांची जादू अजूनही मनात कायम आहे.

*बुधवारी रात्री ८ वाजता सिलोन केंद्रावरुन बिनाका / सिबाका गीतमाला प्रसारित व्हायची. त्या आठवड्यात हिंदी चित्रपटात गाजलेली दहा गाणी उलट क्रमानं सादर केली जात. त्यावेळी "नमस्कार, बहनों और भाईयो, मैं आपका दोस्त अमीन सायानी..." हे ऐकण्यासाठी देशातले सगळे संगीतप्रेमी कानांत प्राण आणून रेडिओ जवळ बसत असत...*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य