दादा..! भाग- ४०
*दादा..!*
*भाग - ४०*
राजेगाव ते नाहोली हे अंतर फारसं नाही. रस्त्यानं पाच आणि मधून पाऊलवाटेनं फक्त तीन किलोमीटर. पाऊलवाट तशी आडवळणाचीच होती, लोकांनी आपल्या सोयीसाठी काढलेली. बांधाबांधानं, उभ्या पिकांतून वाट काढत जावं लागायचं आणि पुढं 'तो' नाहोलीचा एकच ओढा तीनदा ओलांडावा लागायचा. तरीही लोकं तिथूनच जात.
नाहोलीत जिल्हा परिषदेची दहावीपर्यंत शाळा. *आमच्या गावात सातवी पास झालेली बहुतांश मुलं आठवीला नाहोलीला जात. पाऊस आला, ओढ्याला पाणी आलं की, बाहेर गावच्या मुलांना शाळेला सुट्टी असायची.* शिक्षणाबाबत जागरुक असलेले पालक मात्र मुलांना शहरात शिकायला घालत.
मोठा चुलत भाऊ दत्तूबप्पानं नाहोलीच्या शाळेतूनच दहावीची परीक्षा दिली होती, त्याचे दोन विषय गेले होते. त्यामुळं आठवीला तिथं जाण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती.
सातवीचा निकाल लागला, मी पहिल्या क्रमांकानं पास झाल्याचं कोळ्याच्या रामुनं सांगितलं. निकाल आणायला शाळेकडं निघालो, आबानं खवा आणि साखर एकत्र कालवून दिली. 'सगळ्यांना वाट' म्हणून सांगितलं. तेच आमचे पेढे होते. जाधव गुरुजी, तिरमक गुरुजी आणि गोरख गुरुजी ऑफिसमध्येच बसलेले होते. सगळ्यांनी माझं कौतुक केलं. मी त्यांना पेढे दिले, त्यांचं दर्शन घेतलं. *जाधव गुरुजींनी जवळ घेतलं, पाठ थोपटत म्हणाले, "आठवीला कुठं जाणार?"*
*मी म्हणालो, "काही ठरलं नाही."*
*"तीन वर्षांत खूप शाळा बुडली, तरी तू पहिला क्रमांक सोडला नाहीस. आता कुठंतरी शहरात शिकायला जा, कल्याण होईल !" गुरुजींनी आशीर्वाद दिला.*
घरी गेलो, दारातच खमंग वास आला. *आईनं आमटीला झणझणीत फोडणी दिली होती. तिच्या हातची साधी वांग्या, बटाट्याची भाजीही खूप चवदार लागायची.*
*काकूंनं दोन्ही पायांच्या पकडीत पाटा घट्ट पकडला होता. मऊ शिजलेली हरभऱ्याची डाळ आणि गूळ एकत्र केला होता. ते मिश्रण पसा पसा पाट्यावर घेऊन वरवंट्यानं पुरण वाटीत होती. खरं तर, लेक सातवी पास झाल्याचा ती आनंदच वाटीत होती !*
*मला बघून तिला आनंद झाला, तिनं मला जवळ घेतलं, तोंडावरुण हात फिरवला. पुरणाचा एक घास खाऊ घातला, मूठभर पुरण खायला दिल. मला अंगात स्फुरण चढल्यासारखं वाटलं. काकू काहीच बोलली नाही, मला सगळं समजलं होतं. मुलांचं कौतुक झालं की आईबापांच्या अंगावर मूठभर मास चढतं !*
बाईनं एका पाटीत पाणी घेतलं होतं, पाण्यात चांगले शेजाला आलेले आंबे होते. *बाई पाटीतला एक एक आंबा घ्यायची, डाव्या हातात उभा धरायची, अंगठ्यानं देठाला दाबून धरुन उजव्या हाताच्या बोटांनी त्याला बिलबिल करायची, चांगला धुवून, त्याचं देठ काढून पातेल्यात ठेवायची.*
*आमरस, पोळ्या, भात, आमटी, पापड, कुरडया, भजी अशी जोरदार तयारी चालू होती. सगळं घर आनंदात होतं...*
सगळे जेवायला बसलो. मी दादांना म्हणालो, "मला बीडला शिकायला जायचंय."
*दादा म्हणाले, "कृष्णाची सातवी होऊ दे, एव्हढं आठवीचं एक वर्ष नाहोलीला काढ. पुढल्या वर्षी दोघांनाही बीडला घालतो."*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*