दादा..! भाग- ३९

*दादा..!*

*भाग - ३९*

  मराठवाड्याच्या ग्रामीण भागात खाजगी शिक्षण संस्था कमी आहेत. अनेक गावांत दहावीपर्यंत जिल्हा परिषदेच्याच शाळा आहेत. आमच्या गावात मात्र सातवीपर्यंतच शाळा होती. *त्यावेळी सातवीलाही बोर्ड होतं, आणि 'बोर्ड' या शब्दाची बऱ्यापैकी दहशत होती.*

  माझी सातवी बोर्डाची परीक्षा नांदूरला झाली. जाधव गुरुजींनी आमची चांगली तयारी करून घेतली होती. परीक्षा काळात गुरुजीही आमच्यासोबत नांदूरमध्ये राहिले.
 
   परीक्षा झाल्यानं मला सुट्ट्या लागल्या होत्या. *गावात रामायण बसविण्याच्या हालचाली सुरू होत्या. पिंपरी आणि चाकरवाडी या पवित्र धार्मिक स्थळांच्या परिसरात आमचं गाव आहे. माऊली महाराज नेहमी गावात येत. कीर्तन, प्रवचन करत. त्यांचा शब्द लोक प्रमाण मानत. माऊलींच्या सहवासामुळे गावात वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम वर्षभर चालू असत. फुलांची बाग जवळ असल्यावर सगळा परिसर सुगंधित होतोच की !*

  *दर एकादशीला गावात रात्रभर जागर आणि बारशीला पंगत असायची.* श्रावण महिन्यात कधी रामविजय, कधी हरिविजय तर कधी पांडवप्रताप ग्रंथ बसविले जात. वाचकानं ओवी वाचायची आणि सुचकानं त्या ओवीचा अर्थ सांगायचा, असा कार्यक्रम चाले. श्रोते तल्लीन होऊन ऐकत.

  *तुकाराम बीजेनिमित्त गावात अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जायचं.* पहाटे काकडा आरती, सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ आणि रोज रात्री हरिकीर्तन व्हायचं. लांबून लांबून आलेले महाराज कीर्तन सेवा देत. अंबाजोगाईचे ह भ प विनायक महाराज काचगुंडे व्यासपीठ चालवत. सकाळी, संध्याकाळी पंगती बसायच्या. नाथ षष्ठीची पंगत आमच्याकडं असायची. आठवडाभर गावात सगळ्यांच्या चुली बंदच असत. असा *हा आनंदाचा सोहळा कधी संपूच नये, असं वाटायचं. सत्संग नेहमीच अपार आनंद देतो, नाही का !*

  रामायण बसवायचं ठरल्यावर गावात उत्साह संचारला. सगळे अंग मोडून कामाला लागले. मंदिरावर भोंगे लागले. मंदिराच्या समोर भव्य मंडप उभारला. मंदिराचा परिसर भगव्या पताकांनी सजला. लोकांनी घरांवर भगवे झेंडे लावले. सगळ्यांच्या आनंदाला जणू उधाण आलं होतं.

गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटपासूनच लाऊड स्पीकरवर अभंग चालू होते. अधून मधून बलभीम बापू लोकांना सूचना देत होते. माताभगिनींनी आपल्या आपल्या घराचा परिसर स्वच्छ केला होता. दारात रांगोळ्या काढल्या होत्या. रस्त्यावर फुलांचा सडा टाकला होता. सगळं वातावरण भक्तिमय झालं होतं आणि भक्त भक्तिरसात न्हाले होते.
*चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मंगलदिनी तिकडे पूर्वेला सृष्टीतील चराचराला प्रकाशमान करण्यासाठी सुर्याचा उदय होत होता आणि इकडे राजेगाव नगरी प्रभू श्रीरामाच्या स्वागताला सज्ज झाली होती. गावातल्या प्रमुख रस्त्यांवरून 'श्रीराम जय राम जय जय राम' चा जप करत, टाळ, मृदुगांच्या गजरात 'रामा'यणाची मिरवणूक निघाली होती.*
मिरवणुकीत आबालवृद्ध नटून थटून सामील झाले होते. चौकाचौकात फुगड्यांचे डाव रंगले होते. अभंग म्हणत, पाऊल खेळत सगळे नाचत होते. मीही त्यांच्यात सामील होतो.

   रात्रीची जेवणं झाली, आम्ही मंडपात जाऊन बसलो. मंडप गर्दीनं फुलला होता. टाळ्यांच्या गजरात रामनामाचा जप चालू होता.  हनुमानाच्या समोरच्या बाजूला वाचक आणि सुचकाला बसण्यासाठी पाट मांडले होते. चौरंगावर रामायण ठेवलं होतं. *अचानक दादा मला म्हणाले, "जा वाचायला."*

*मी म्हणालो, "मला जमंल का?"*

*"जमेल का नाही, या भीतीमुळेच आपण अडाणी राहतो, जा !" दादांनी माझे डोळे उघडले.*

  *त्यानंतर मला रामायणाची चांगलीच आवड लागली. मी चांगला 'वाचक' झालो. हनुमानाच्या गाभाऱ्यात प्रभुरामचंद्राचा जयघोष अनेक दिवस चालू होता. पुरुषोत्तम मेटे, भास्कर मेटे आणि केरबा झेंडे ओव्यांचे अर्थ सांगत. बलभीम मेटे, रतन चौधरी, फुलाबाई कदम आणि मी 'रामायण' वाचत. लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमात मला वाचण्याची संधी मिळाली नाही, ही खंत मात्र कायम राहिली...*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*


Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य