दादा..! भाग - ४३
*दादा..!*
*भाग -४३*
गावाच्या मध्यभागी असलेलं हनुमान मंदिर हे आमच्या गावातलं एकमेव मोठं देऊळ. तेच सगळ्या गावकऱ्यांचं श्रद्धास्थान ! मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे. तो सभामंडप म्हणजे लहान मुलांचं खेळण्याचं आणि म्हाताऱ्या माणसांचं आराम करण्याचं हक्काचं ठिकाण ! लग्नकार्य, राजकीय सभा, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम मंडपातच होतात.
दादांनी मंदिरासमोर बैलगाडी उभी केली, बैलांचा कासरा ताणून गाडीच्या खुटल्याला बांधला. आम्हाला उतरून मारुतीचं दर्शन घ्यायला सांगितलं. त्यांनी गाडीतूनच हात जोडले. *दादांची देवावर श्रद्धा होती, पण त्यांनी कधी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलं नाही. ते कीर्तन आवडीनं ऐकत, पण कधी महाराजांच्या जवळही जात नसत. त्यांनी कधी देवदेवही केले नाहीत. 'आपलं काम आपण इमानानं करावं', त्यातच देव आहे ! अशीच त्यांची धारणा असावी.* अमावास्येला किंवा घरात एखादी चांगली घटना घडली की, दादा आवर्जून आम्हाला मारुतीला नारळ फोडायला लावत.
मी आणि कृष्णा खाली उतरलो. "देव बाप्पा खुशाल ठेव", असं म्हणून मारुतीचं दर्शन घेतलं. मंडपात फारशी वर्दळ नव्हती. एका बाजूला लहान मुलं गोट्या खेळत होती, दुसऱ्या बाजूला एकनाथराव मेटे, करीम साहेब, तुकाराम मेटे यांच्या गप्पा चालल्या होत्या. दादानं हातानं खुणावलं, आम्ही त्यांच्याही पाया पडलो. *आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना आदरानं बोलणं.. त्यांच्या पाया पडणं, ही दादांचीच शिकवण!*
एकनाथ भाऊ म्हणजे गावातलं मोठं प्रस्थ ! भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि मराठवाडा मुक्ती संग्रामात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता, त्यामुळं पंचक्रोशीत त्यांना मान होता. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता. स्वातंत्र्यानंतर सलग वीस वर्षे ते गावचे सरपंच होते. उंचीपुरी, दणकट शरीरयष्टी, धारदार नाक, करारी मुद्रा, अंगात तीन गुंड्याचा शर्ट, पांढरं शुभ्र धोतर आणि डोक्यावर पालकुरी फेटा.. अशा रांगड्या व्यक्तिमत्वाला साजेसा त्यांचा आवाजही होता. लोकांना त्यांची आदरयुक्त भीती वाटे. घर, जागा, जमीनीचे वाद असोत की घरगुती भांडणं.. भाऊ गावातच मिटवत. सगळेच त्यांचा शब्द अंतिम मानत.
अलीकडच्या काळात भाऊंना दिसत नव्हतं. तरी ते काठीच्या मदतीनं सगळ्या गावात फिरत. रस्त्याचा अचूक अंदाज घेत, हव्या त्या ठिकाणी जात. गावातले सगळे रस्ते, घरं, माणसं, त्या माणसांचे गुण, अवगुण यांची त्यांना खडानखडा माहिती होती. एखाद्या दिवशी अगदी सकाळी सकाळीच भाऊ दादांकडं येत. नेमकं दारापुढं आलं की, "भिमराव, आहेत का घरी?" म्हणून हाक मारत, ख्यालीखुशाली विचारत. अजिबात दिसत नसताना नेमकं ठिकाण शोधणं, आवाजावरून अचूक माणूस ओळखणं.. भाऊंच्या या कौशल्याचं आम्हाला नवल वाटायचं !
*वयानं, मानानं आणि अधिकारानं भाऊ खूप मोठे होते, तरीही ते सर्वांना आदरानं बोलत. पानं, फुलं आणि फळांनी बहरलेली झाडं झुकलेलीच असतात, नाही का?*
सातवीपर्यंत शिक्षण झालं, त्या शाळेसमोरून जाताना मन गलबलून आलं. डोळं पाणावलं. दादांच्या नजरेतून ते सुटलं नाही. *"घर सोडल्याशिवाय जग कळत नाही आणि गाव सोडल्याशिवाय माणूस स्वतःच्या पायावर उभा राहात नाही...," दादा बोलत होते, आम्ही ऐकत होतो.* गाडी चालली होती, शिरूर जवळ येत होतं...
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*