दादा..! भाग - ४४

*दादा..!*

*भाग - ४४*

  *शिरूरला अडीचची गाडी 'अडीच नंतर कधीही' यायची. कच्च्या रस्त्यावरील धुळीचे लोट उडवीत येणारी लालपरी लांबूनच दिसायची.* पाण्याच्या टाकीला वळसा घालून ठरलेल्या ठिकाणी उभी राहायची. बाजूला दोन तीन साधी हॉटेलं होती. ड्रायव्हर, कंडक्टरचं तिथं चहा, पाणी व्हायचं. तोपर्यंत गाडीवर प्रवाशांचाच ताबा असायचा!

  गाडी दिसताच वैतागलेल्या प्रवाशांचे चेहरे उजळले, सगळ्यांची एकच लगबग सुरु झाली. आम्ही आपापल्या पेट्या उचलल्या, दादांनी पिशव्या घेतल्या. उतरणाऱ्यांना घाई होती.. चढणारे तर हातघाईवर होते.. ज्यांनी खिडकीच्या गजांना लोंबकाळून सीटवर टोप्या, रुमाल टाकून जागा धरली होती, ते मात्र निवांत होते.

  येळंब घाट, नेकनूर, मांजरसुंभा मार्गे बीड हे जेमतेम पन्नास किलोमीटरचं अंतर. त्यावेळी बीडला ६ रुपये ३० पैसे तिकीट होतं. पण, शिरूर ते नेकनूर ३ रुपये आणि नेकनूर ते बीड ३ रुपये.. अशी कटबुकींग केली तर ६ रुपयांत जाणं व्हायचं. (अर्थात, दोन तीन वेळा बीडला जाणं - येणं केल्यावर ही 'आयडिया' आमच्या लक्षात आली. मग आम्ही नेकनूरचं तिकीट काढायचो.. तिथं उतरायचो.. पुन्हा त्याच किंवा दुसऱ्या गाडीत बसायचो. सामानाच्या पिशव्या घेऊन चढ-उतार करताना मोठी कसरत करावी लागायची. पुन्हा जागाही मिळत नसायची, पण दोघांचे ६० पैसे वाचायचे.)

  आम्हाला मागच्या सीटवर जागा मिळाली. आदळत, आपटत का होईना आमच्या जीवनाची गाडी एका नव्या रस्त्यानं धावू लागली. दादा जवळच बसले होते. रस्त्यानं लागणाऱ्या गावांची, आसपासच्या परिसराची ते आम्हाला माहिती सांगत होते. बीड हायवे ला गाडी येताच चाकरवाडीतल्या मंदिरांचे कळस दिसले. दादा म्हणाले, *"उत्तरेश्वर पिंपरीचे माऊली महाराज तुम्हाला माहीत आहेतच, लोकं त्यांना अवतारी पुरुष मानतात. मागच्या काही वर्षांपासून ते या चाकरवाडीत राहात आहेत. कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करत आहेत. रोज हजारो भाविक त्यांच्या दर्शनाला येतात. कुठल्याही भक्ताने, कोणत्याही वेळी यावे, माऊलींचे दर्शन घ्यावे.. प्रसाद सेवन करून तृप्त मनाने मार्गस्थ व्हावे.. अशी श्रीक्षेत्र चाकरवाडीची ख्याती सगळीकडे पसरली आहे."*

  बघता बघता नेकनूर आलं. डोळे मिटत दादांनी दोन्ही हात जोडले. आम्ही प्रश्नार्थक नजरेनं पाहताच ते सांगू लागले, "नेकनूरचं आधीचं नाव निनगुर होतं. पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात रोज देवाचा काकडा म्हणणाऱ्या बंकटस्वामी महाराजांचं हे गाव. महाराष्ट्रभर फिरून त्यांनी वारकरी संप्रदाय वाढवला. संत वामनभाऊ, संत भगवान बाबा त्यांचेच शिष्य होते. लिंगायत धर्माचे शिवयोगी, संत शिरोमणी मन्मथस्वामींचा जन्मही इथंच झाला. मांजरसुंभ्याजवळ बालाघाट डोंगराच्या खोल दरीत कपिलधार नावाचं निसर्गरम्य ठिकाण आहे, तिथं त्यांची समाधी आहे. जवळच धबधबा आहे, पावसाळ्यात हा कपिधारचा धबधबा बघायला आवर्जून लोकं येतात."

रविवारी नेकनूरला गुरांचा मोठा बाजार भरतो. बाजारात अस्सल गावरान, उस्मानाबादी शेळ्या, मुऱ्हा जातीच्या म्हशी खात्रीनं मिळतात. टोकदार शिंगे, मजबूत वशिंड आणि काळे खूर असलेल्या खिल्लार खोंडासाठी नेकनूरचा बाजार प्रसिद्ध आहे.

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*



  

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य