दादा..! भाग - ४५

*दादा..!*

*भाग - ४५*

    मांजरसुंभ्याच्या पुढं घाट सुरु झाला...
*बालाघाटचे उंच उंच डोंगर.. त्या डोंगरांची पोटं फाडून तयार केलेला तीव्र उताराचा रस्ता.. अचानक लागणारी कठीण वळणं.. वाहनांच्या धडकेने तुटलेले वळणावरचे कठडे.. कासवगतीनं पुढं सरकणाऱ्या वाहनांच्या रांगा.. कुतूहल वाढविणारं.. तितकंच थरकाप उडविणारं हे दृश्य.. आम्ही पहिल्यांदाच बघत होतो !*

मी श्वास रोखून बसलो होतो...
*वरती येणारी वाहनं नेटानं घाट चढत होती.. घाट उतरणाऱ्या वाहनांच्या ब्रेक्सचे चर्रर्र करणारे आवाज थेट काळजात घुसत होते.. गाडी वळणावरुन वळविताना ड्रायव्हरचं कौशल्य पणाला लागत होतं.. आमच्या पोटात भीतीनं गोळा येत होता !*

उसनं अवसान आणून मी खिडकीतून बाहेर पाहिलं...
*काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसानं हवेत हलकासा गारठा जाणवत होता.. त्या गार हवेचा स्पर्श अंगाला हवाहवासा वाटत होता.. आपटा, कडुनिंब, बाभळी अशी कितीतरी जंगली, काटेरी, खुरटी झाडंझुडपं हिरवी व्हायला लागली होती.. करवंद, सीताफळ, जांभळीच्या झाडांना नवी पालवी फुटायला लागली होती.. डोंगराच्या खडकाळ, खडबडीत पाठीवरच्या लालसर मातीतून गवताची हिरवी पाती डोकं वर काढायला लागली होती.. अधूनमधून येणारे निरनिराळ्या पक्ष्यांचे मधुर आवाज कानांना गोड लागत होते...*

मी मानेच्या शिरा ताणून खोल दरीत पाहिलं...
*दरीतल्या खोलगट भागात साचलेलं पावसाचं पाणी मावळतीला गेलेल्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी चमचम चमकत होतं.. नुकत्याच फुटलेल्या बाजूच्या हिरवळीवर चरणारी गुरं अगदीच लहान लहान दिसत होती.. मानेवर आडवी ठेवलेली काठी दोन्ही हातांनी घट्ट पकडून ऐटीत उभा असलेला गुराखी बुजगावण्यासारखा दिसत होता...*

मला सहज प्रश्न पडला...
*इवलंसं, खुरटं गवत त्या गुरांना खाता तरी येत असेल का?*
*त्यांनी कितीदा दातावर दात आपटल्यावर 'एक घास' त्यांच्या पोटात जात असेल?*

घाट संपेपर्यंत शांत बसलेले दादा पाली ओलांडताच म्हणाले, "इथं जवळच 'खजाना बावडी' आहे."

*खजाना बावडी?"* मी आणि कृष्णानं आश्चर्यानं विचारलं.

*"हो.. तिला 'खजिना विहीर' असंही म्हणतात.*
*सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी, मलिक अंबरच्या काळात ही विहीर बांधली. जाणकार सांगतात की, तेव्हा धन, दौलत जपून ठेवण्यासाठी या विहिरीचा उपयोग केला जात होता, म्हणून तिला "खजाना बावडी" नाव पडलं."*

दादा सांगत होते...
आम्ही 'आ' वासून त्यांच्याकडं बघत होतो...

थोडं थांबून दादा म्हणाले, *"मी स्वतः विहीर पाहिली आहे, आत्ताही या भागातली जवळपास साडेचारशे एकर शेती या विहिरीच्या पाण्यावर भिजते. विहिरीत कमीत कमी चार फुट पाणी कायम असते.. ते पाणी भर पावसाळ्यात वाढत नाही आणि कडक उन्हाळ्यातही आटत नाही.. आहे की नाही खजिना !"*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य