दादा..! भाग -५२
*दादा..!*
*भाग - ५२*
*शेतात जाऊन.. ज्वारीचा, मकाच हुरडा भाजून खाण्यात, हरभऱ्याचं डहाळं मुठीत धरून एक एक घाटा तोडून खाण्यात आणि मुगाच्या शेंगा स्वतः तोडून, सोलून खाण्यात वेगळीच मजा असते !*
मकाची कणसं भाजायची होती, म्हणून आम्ही सकाळी लवकरच शेताकडं तोंडं केली. आमचा रंगरोख ओळखून आबा म्हणाले, "आधी थोडं काहीतरी खा, अन मग रानात जा !"
"अजून स्वयंपाकच झाला नाही,"
आम्ही वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला...
*पण आबा म्हणाले, "सैपाकाची कशाला वाट बघायची, धा-पाच मिंटात भाकरी व्हत्याल, एखादी एखादी गरम भाकर दुधात मुरगाळली.. म्हंजी कसं, मागच्या माणसाला घोर राहात नाही !"*
*कितीही घाई असो, 'काहीतरी खाल्ल्याशिवाय घर सोडायचं नाही', हा आबांचा नेहमीचाच आग्रह !*
दत्तूबप्पा, मी, कृष्णा, बालू शेतात निघालो..
तसा *बाईनं वैधानिक इशारा दिला, "मुगाच्या शेंगा खिशात ठिवू नका, कपड्याचं डाग निघत नाहीत."*
उडीद, मूग, तूर, मका ही मोरवंडीची सगळीच पिकं जोरात होती...
*तूर तर चांगली आमच्या कमरेला लागत होती, फुलोऱ्यात आली होती. हिरव्यागार, कोवळ्या लुसलुशीत, लांबट पानांचं आणि पिवळ्याधमक नाजूक, साजूक फुलांचं ओझं, त्या किडमिडीत फांद्यांना आता सोसेनासं झालं होतं. पानं, फुलं आणि कळ्यांनी बहरलेल्या तुरीच्या फांद्या, वाऱ्याच्या झोतानं पंचमीच्या आधीच झोके घेत होत्या !*
*मुगाला पानं कमी.. शेंगाच जास्त दिसत होत्या !*
*उडदाच्या बुटक्या झाडांची पानं मात्र अजून हिरवीगार होती, त्या पानांच्या आडून शेंगांचे घोसच्या घोस लोंबकळत होते !*
*काकरीत फिरून, फिरून आम्ही निबर, निबर शेंगा तोडत होतो.. आमचे हातही चालू होते आणि तोंडही !*
दुपार झाली होती...
दादा, आबा जनावरं घेऊन येत होते, आबांच्या बगलेत रेडिओ होता. आपली आवड चालू होती...
*मळ्याच्या मळ्यामंदी, पाटाचं पाणी जातं..*
*गुलाब जाई जुई, मोगरा फुलवित..*
'साधी माणसं' मधलं हे गाणं लागलं होतं...
कासरा हातात धरून दोन बैलांच्या मध्ये दादा चालत होते, आशा म्हशीवर बसली होती, म्हशीचं दावं आबानं घट्ट पकडलं होतं. *अंगात कोपरी, धोतर, पायात चामड्याचा बूट, डोक्यावर टोपी, सोबत टॉवेल असलेले दादा, आबा सुद्धा किती 'साधी माणसं' होती !*
आबानं कणसासकट भाराभर मका उपटली, दादानं कणसं मोडून घेतली, धाटं जनावरांना टाकली...
आम्ही वाळलेल्या काटक्या जमवून रामकटीच्या खाली सावलीला ठेवल्या होत्या. सगळ्यांनी मिळून कणसांचा पाला काढला. आबा पुन्हा पुन्हा सांगत होतं, "पाल्याचा एखाददुसरा पडदा कणसाला राहू द्या, नाहीतर कणसं करपतील."
काटक्यावर सगळी कणसं पसरली.
एका बाजूनं आग लावली !
लांबकी लाकडं घेऊन दादा, आबा कणसं उलथा पालथा करत होते..
कणसाच्या वरचा पाला जळून गेला...
*कणसाचं काही दाणं खरपूस भाजलं होतं, काही दाणं आराच्या ऊष्णतेनं नुसतं उकडलं होतं...*
*पण त्या अर्ध्या कच्च्या भाजलेल्या कणसांची चव दुसऱ्या कशालाही नव्हती !*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*