दादा..! भाग - ४७

*दादा..!*

*भाग- ४७*

  *बीडला पांडवकाळात 'दुर्गावतीनगर' म्हणत. चालुक्य काळातील चंपावती राणीच्या नावावरुन देण्यात आलेलं 'चंपावतीनगर' हे या शहराचं दुसरं नाव. परंतु बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी, बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात, खाचखळग्यात.. बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसलं आहे, त्यावरुन 'बीड' हे नाव पडल्याचं सांगितलं जातं !*
 
  पायंडल मारुन मारुन रिक्षावाला मेटाकुटीला आला होता, घामाघूम झाला होता. काहीतरी बोलायचं, म्हणून दादानं विचारलं, "नाम क्याय तुम्हारा?"

"उस्मान..."
धापा टाकत त्यानं उत्तर दिलं.

मला पुन्हा आमच्या उस्माभईंची आठवण झाली...
आमच्या उस्मानभईंना जमीन नव्हती, कुणाचा मोठा आधार नव्हता, पण त्यांच्यात जगण्याची कला होती. त्या कलेच्या जीवावर ते आयुष्यभर मजेत जगले आणि कुटुंबाला जगवलं...

*उस्मानभई शेळ्यांचा व्यापार करत. खरं तर, व्यापार करायला त्यांच्याकडं तेवढं भांडवल नव्हतं, होतं ते फक्त.. तोंडी भांडवल !* शेख रहीम आणि रब्बूभईंना सोबत घेऊन उस्मानभई रोज एका खेड्याला जात. राजेगावच्या पंचक्रोशीत असलेल्या दैठणा, बहुला, पिंपळगाव, माळवाडी, नाहोली या खेड्यात त्यांचा सर्वांशी चांगला परिचय होता. तिथून ते शेळ्या, बोकडं उधारीवर खरेदी करत. खरेदी केलेला माल सोमवारी कळंब, गुरुवारी साळेगाव आणि रविवारी नेकनूरच्या बाजारात रोखीनं विकत. ठरलेल्या वेळी लोकांचे उधारीचे पैसे देत, मिळविलेल्या नफ्यावर तिघांचं कुटुंब चाले !
*अक्कल आणि शक्कल वापरुन, उस्मानभई कमी कष्टात चांगलं जगत आणि इतरांनाही जगवत !*

  रिक्षा नेमक्या ठिकाणी थांबला. गिराम गल्लीत, कचरुलाल बोरा यांच्या वाड्यात दादानं आधीच एक खोली भाड्यानं ठरविलेली होती. खोली सिंगल होती, पण ऐसपैस होती...

*कचरुलाल बोरा.. खोली मालक ! सगळे त्यांना जिजाजी म्हणायचे. जेमतेम उंची, बऱ्यापैकी तब्येत आणि अंगात कायम सफारी घालणारा हा माणूस.. पायात मात्र कधीच काही घालत नसे !* पहाटे लवकर उठून कारंजापर्यंत अनवाणी पायाने एक चक्कर मारायची.. परत आलं की दारात बंब मांडायचा, लाकडाच्या छोट्या धलप्यावर थोडंसं रॉकेल टाकून बंब पेटवायचा.. पाणी तापेपर्यंत हिंदी गाणी गुणगुणत तिथंच घिरट्या घालायच्या.. घंगाळभर कडक पाणी घेवून, हाश.. हुश करत लाईफबॉय साबणानं अंघोळ करायची.. आणि मग जिजीला उठवायचं !
हा जिजाजींचा नित्यक्रम होता...

*सफारी ड्रेस आणि लाईफबॉय साबणावर जिजाजींचं प्रचंड प्रेम होतं !*

जिजी निवांत उठत..
शांतपणे घरादाराची साफसफाई करत. तोपर्यंत जिजाजी कारंजा रोडपासून दुसरा राऊंड मारुन आलेले असत. दोघं मिळून चहा, नाष्टा करत, मग जिजाजी कामाला जात...

  *जिजी खूप कमी बोलत. कधी भांडण नाही.. कधी चिडचिड नाही.. की कधी आदळआपट नाही ! त्यामुळं घरात नेहमीच स्मशान शांतता असायची..*
*त्यांना पितळी भांडी आणि स्वच्छतेची खूप आवड होती. अख्खा दिवस त्या भांडी घासण्यात आणि फरश्या पुसण्यात घालवत.. कामात मन गुंतवत !*
*काय करणार?*
*त्यांना मूलबाळ नव्हतं...*

*क्रमशः..*
               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य