दादा..! भाग - ५५

*दादा..!*

*भाग - ५५*

  *मांजरा नदीला बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याची हद्द समजली जाते.* आमच्या राजेगावपासून बहुला हे गाव अगदी जवळ आहे, फक्त दोन किलोमीटर.. पण राजेगाव बीड जिल्ह्यात तर बहुला उस्मानाबाद जिल्ह्यात आहे ! बहुल्याला कळंब गाडी मुक्कामाला असायची, अजूनही आहे !

  आम्हाला रविवारी बीडला जायचं होतं. दोन महिन्याचं खोलीभाडं थकलं होतं, जायला पैसे लागणार होतं, तिथं तेल, मीठ घ्यायला पैसे लागणार होतं...
दादाकडं पैसे नव्हते !
*पण दादा तसं काही सांगतही नव्हते !!*

पापड्या, कुरडया करताना चीक घ्यायला लागणारी घरात दोन पितळी भांडं होती. दादांना हे चांगलं माहीत होतं. रविवारी ते पहाटंच उठले, म्हाताऱ्या बाईला उठवलं. तिच्याकडून एक भांडं रिकामं करून घेतलं आणि साखराच्या मोकळ्या पोत्यात घालून, त्याचं तोंड बांधलं...
म्हातारी म्हणली, "आरं काय करतो.. भिमा?"

".........", दादा गप्प.

*बाई टकाटका दादाकडं बघत होती, पण दादांना बहुला गाडी गाठायची होती !*

आबानं भट्टीहून किलोभर खवा आणला.. त्याची मिठाई बनवली.. सगळ्यांना खायला दिली !

*आईनं चपात्या केल्या.. त्याच तव्यावर मूठभर हिरव्या मिरच्या टाकल्या.. थोडंसं तेल टाकलं.. उलथण्यांनं खाली वर केल्या, आबडधोबड भाजल्या.. सगळीकडं ठसका उठला.. तेव्हा तिनं तवा खाली घेतला.. त्यात अजून थोडंसं तेल, थोडं मीठ, थोडं शेंगदाण्याचं कूट टाकलं.. तवा दोन्ही पायांत घट्ट पकडला.. आणि पितळी तांब्यानं मिरच्या रगडल्या...*
*तेव्हा त्या ठेच्याचा खरपूस वास सगळ्या घरात पसरला !*

काकूनं हात, पाय, पाठ दगडानं घासून, चांगलं चोळून मोळून आंघोळ घातली !

जेवणं झाली, पिशव्या भरल्या.. आणि आम्ही सगळे दादांची वाट बघत बसलो. कळंबमध्ये भांडं मोडून दादा दस्तगीरच्या जीपनं परत आले...
तेव्हाच आम्हाला शिरूरचा रस्ता धरता आला !

  त्यावेळी घरात पितळी भांडी खूप होती, मोडीवर त्यांना चांगला भावही मिळायचा...
*ज्या ज्या वेळी आम्हाला पैशाची गरज असायची, आणि दादांकडे पैसे नसायचं.. त्या त्या वेळी दादा भांडी मोडायचं !*

*एक एक करून दादांनी सगळी मोठी पितळेची भांडी मोडली आणि अस्सल सोन्याची 'भांडी' घडवली !*

*म्हाताऱ्या बाईचा पितळी भांड्यावर लई जीव होता...*
एखाद्या दिवशी.. एखादा तांब्या जरी दिसला नाही तरी बाई म्हणायची, "भागीरथी, तांब्या दिसत नाही, काही घालून कुणाला दिलाय का?"

*डोळ्यांदेखत भांडं घेऊन जाताना, बाईचा जीव तीळ तीळ तुटत असंल...*
पण, *कर्तव्य पार पाडताना दादा कठोर होत !*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*



  

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य