दादा..! भाग - ५०

*दादा..!*

*भाग - ५०*

  *भगवान विद्यालय म्हणजे कडक शिस्त ! सगळं कसं घड्याळाच्या काट्यावर चालायचं.. शाळा भरणं, सुटणं, सर्व तास.. वेळच्या वेळी व्हायचे !*

मॅट्रिकच्या परीक्षेच्या तयारी आठवीपासूनच करून घेतली जायची !

बीजगणित सातपुते सर शिकवत, फळ्यावर उदाहरण सोडवून देत..
बांगर.. तुला समजलं का?
गिते.. तुला समजलं का??
असं काही मुलांना विचारत, आमच्या तुकडीत जवळपास ५० मुलं होती, सगळ्यांना विचारणं शक्य नसायचं. मग ज्याला समजलं नाही, त्याला उभं राहायला सांगत..
*दोनदा, तीनदा.. जोपर्यंत सगळ्यांना चांगलं समजत नाही, तोपर्यंत 'स्टेप बाय स्टेप' समजावून देत !*

काही उदाहरणं वर्गात सोडवून घेत..
*'स्वाध्याय' घरुन सोडवून आणायला सांगत आणि दुसऱ्या दिवशी ते आवर्जून तपासत !*

*सातपुते सर म्हणत, "गणितं लक्षात ठेवू नका, ते सोडविण्याचे 'तंत्र' लक्षात ठेवा ! स्टेप बाय स्टेप सोडवा.. एकही गुण कमी होणार नाही !*

भौतिकशास्त्र तिडके सरांकडं होतं..
रसायनशास्त्राला जगताप सर होते, ते थोडं नाकांत बोलत !
अणू, रेणू.. म्हणजे काय?
संयुग कसे बनते??
मूलद्रव्ये, त्यांच्या संज्ञा कशा तयार झाल्या?
*व्याख्या लिहून देताना, पाठीमागं हात बांधून, दोन बेंचच्या मधून फिरणारे.. कोण लिहितंय? कोण नाही? ते चष्म्याच्या वरून, तिरक्या नजरेनं पाहणारे जगताप सर अजूनही चांगले आठवतात..*

  दीड दोन महिन्यांत आम्हाला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांच्या ओळखी झाल्या, काही हुशार मुलांशी मैत्री झाली. त्यातल्या त्यात *वाघिऱ्याचा सुभाष बांगर, पालीचा अर्जुन घुमरे, भोगलवाडीचा सुग्रीव मुंढे आणि शिरपुऱ्याचा पद्माकर घुले यांच्याशी माझं चांगलं जमायचं !*

  शाळा साडेबारा वाजता सुटायची. रूमवर येवून, स्वयंपाक करावा लागायचा...
तसा जास्त अट्टाहासानं आमचा स्वयंपाक नसायचा.. चार भाकरी थापायच्या आणि हरभऱ्याची भाजी हाटायची !
तरीही जेवायला बसायला दीड - दोन वाजत.
तोपर्यंत मरणाची भूक लागायची...

  *आमचं स्वयंपाकाचं नियोजन ठरलेलं होतं. दुपारी एकानं भाकरी करायच्या.. संध्याकाळी दुसऱ्यानं !*
*दुपारी हरभऱ्याची भाजी.. संध्याकाळी पिठलं !! रोज तेच...*
भाजीत बदल करावा वाटलाच तर आम्ही कधी कधी दाळकांदा करायचो. हरभऱ्याची भाजी, बेसनपीठ, डाळी.. सगळा माल घरूनच आणलेला होता...

*मंडईतल्या भाज्या आणाव्यात, त्या करून खाव्यात.. हे आमच्या कधी लक्षातही आलं नाही. आणि खरं सांगायचं तर, तशी आमची ऐपतही नव्हती...*

नागपंचमी जवळ आली होती..
आम्हाला गावी जायची ओढ लागली होती !

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*



Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य