दादा..! भाग - ५४

*दादा..!*

*भाग - ५४*

*अविनाश.. एक हरहुन्नरी माणूस !*
माझ्यापेक्षा ३-४ वर्षांनी मोठा असेल, त्याचं शिक्षणात त्याचं डोकं चाललं नाही ! दहावीत नापास झाला. ऑक्टोबर.. मार्च.. ऑक्टोबर.. मार्च अशा दोन वर्षे परीक्षा दिल्या.. इंग्रजी, गणित निघालं नाही !

मागास समाजातला होता..
दोन्ही पायांनी अपंग होता...
तो अजूनही म्हणतो, "मॅट्रिक पास झालो असतो तर, कुठंतरी एखाद्या ऑफिसात मोडकी तोडकी खुर्ची मिळाली असती."

पण तसं काही झालं नाही !
*शिक्षणाची दारं बंद झाली, म्हणून घरच्यांनी त्याचं लग्न केलं !*

  जमीन नाही, सगळीच प्रतिकूल परिस्थिती.. असं असतानाही अविनाश डगमगला नाही.. सुशीला नावाची 'सुशील' बायको आता त्याच्या सोबतीला होती !

अविनाशनं कपड्यांना इस्त्री करण्याचं दुकान टाकलं.. काही दिवसांत ते बंद पडलं !
पंक्चर काढण्याचं दुकान टाकलं.. खेडेगाव असल्यानं चाललं नाही.. तेही बंद केलं !

मग त्यानं रॉकेल विकलं, दारु विकली..
दोन्ही चांगलं चालायचं.. पण पोलिसांनी खाक्या दाखवला.. नाइलाजानं तेही बंद करावं लागलं !

या दरम्यान त्याला तीन मुलं झाली !
अविनाशची धडपड थांबत नव्हती...
काही काळ त्यानं विळा, कोयता, कुऱ्हाड, विळी अशा अवजारांना धार लावण्याचं काम केलं.. पण निराश झाला नाही !

मुलं मोठी झाली.. तीही जास्त शिकली नाहीत ! अविनाशनं त्यांनाही धंद्याला लावलं. त्यानं एक जुनं मळणी यंत्र घेतलं.. काही दिवसांनी पिठाची गिरणी टाकली...

त्यात हळूहळू त्याचा चांगला जम बसला ! पैसा येत गेला.. तो गुंतवत गेला. यथावकाश तो वाहतूक क्षेत्रात उतरला. त्यानं प्रत्येकाला एक एक वाहन घेऊन दिलं...

*आज अविनाशकडं दोन मोटारसायकली, रिक्षा, कार, ट्रॅक्टर आणि आयशर टेम्पो आहे !*

  *जिद्द, संयम आणि चिकाटीच्या बळावर अविनाश स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभा राहिला, अपंगत्वाचं भांडवल न करता त्यानं मिळवलेलं यश निश्चित प्रेरणादायी वाटतं !*

*अविनाशच्या प्रसंगावधानामुळं दादा वाचलं !* रोज कुणी ना कुणी दादांना भेटायला येत होतं.. उपळाई दादाचं आजोळ.. त्यांचं मामा, मामी.. नाहोलीची आमची भामा आत्या, मोहन मामा, धोत्र्याची तारा आक्का, शिवा दाजी, सातेफळचं मामा, बहुल्याचं त्यांचंच काका, मावशी असा सगळा गोतावळा भेटून गेला. जवळच्या गावचं पाव्हणं भेटून परत जात, लांबचं पाव्हणं मुक्कामाला थांबत.

*नागपंचमीची सुट्टी केव्हाच संपली होती, आम्हाला बीडला परत जायचं होतं...*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*


Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य