दादा..! भाग - ५१
*दादा..!*
*भाग - ५१*
शनिवारी सकाळी शाळेला जातानाच आम्ही पिशव्या भरून ठेवल्या...
शिरूरला अडीचला पोचणारी गाडी बीडहून दुपारी एकला निघायची, शाळा सुटल्यावर धावत पळत जाऊन ती 'अडीचची गाडी' गाठली. कृष्णाचं तीनदा गावाकडं जाणं-येणं झाल्यानं, त्याला सगळं माहीत झालं होतं...
बीडला येवून दोन अडीच महिनेच झालं असतील, पण वर्ष - दोन वर्षे घरापासून लांब असल्यासारखं वाटत होतं. आपली माती आणि आपल्या माणसांना भेटण्याची ओढ लागली होती...
*गाडी चालली होती.. थांब्यावर थांबत होती.. पुन्हा चालत होती.. पण मन थांबत नव्हतं.. धावतच होतं !*
नांदूरच्या बाजारातून आणलेला शेवचिवडा म्हाताऱ्या बाईनं आमच्यासाठी गाडग्यात घालून ठेवला असेल का?
मुगाच्या शेंगा, मकाची कणसं खायला आली असतील का?
विहिरीला पाणी किती आलं असेल?
अशा असंख्य प्रश्नांची मनात गर्दी झाली होती...
*शिरूरहून राजेगावला चालत जावं लागायचं. पाऊस पडून गेल्यानं शिरूरच्या ओढ्याला पाणी आलं होतं. पाणी जास्त नव्हतं, पण त्याला ओढ जास्त होती ! म्हणूनच त्याला ओढा म्हणत असतील कदाचित !!*
*एकमेकांच्या हाताला धरून आम्ही ओढा पार केला. पुढं गावापर्यंत गाडीवाट होती. त्या वाटावरच्या छोट्या छोट्या खड्यात, बैलगाडीनं पडलेल्या चकारीत पाणी भरलं होतं.. चिखल आणि पाण्याचा सगळीकडं राडा झाला होता ! कितीही सावधपणानं पाय टाकला तरी, एखादी गाळाची चिळकांडी थेट डोक्यापर्यंत उडायची !*
*काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता,*
*माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता !*
*कवी इंद्रजीत भालेरावांची कविता गुणगुणत, चिखल, पाण्याचा रस्ता तुडवत आम्ही गाव गाठलं तेव्हा दिवस मावळतीला गेला होता, आणि आमचा अवतारही बघण्यासारखा झाला होता.*
घरी सगळे आमची वाटच बघत होते. झाकड पडायला लागली, तरी पोरं कशी आली नाहीत? म्हणून दादा तर तीनदा देवळापर्यंत जाऊन आले होते...
*नवी नवरी सासरी नांदून यावी, तसं आमचं घरी कौतुक झालं. बाईनं भाकरीचा तुकडा तव्याच्या पाठीवर काळा केला.. आमच्या अंगाखांद्यावरुन ओवाळला.. आणि आम्ही आलेल्या दिशेला फेकला..*
*काकूनं दृष्ट काढली !*
*मला जवळ घेत, तोंडावरुन हात फिरवत बाई म्हणाली, "शहर वस्तीला राहून चांगलाच उजळलास की" !*
दादा, आबा कुतुहलानं आमच्याकडं बघत होते. आपण पोरांना बीडला शिकायला ठेवलं, याचा आनंद त्यांना लपवता येत नव्हता...
*रात्री जेवणाची पंगत बसली. आईनं टोपलंभर मुगाच्या शेंगा पुढं मांडल्या, जवळ बसून शेंगा सोलून द्यायला लागली. डहाळं, मुगाच्या शेंगा, मकाची कणसं रानातल्या या रानमेव्याची मला प्रचंड आवड आहे, हे सगळ्यांनाच माहीत होतं.*
"शेंगा आपल्यातल्याचं आहेत का?" मी सहज विचारलं.
आई म्हणाली, "हो..."
"कुठं पेरलाय मूग?"
"मोरवंडीला.. सडकाच्या कडीला", आई.
"यावर्षी मका पेरली नाही व्हय?" मी.
"पेरलीय की, आंब्याच्या वरच्या टुकड्यात."
*'आंब्यांची झाडं कधीच तोडली होती, पण अजून काळजातनं कुणीच काढली नव्हती' !*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*