दादा..! भाग - ६७

*दादा..!*

*भाग - ६७*

  *'सूर्य छाप जर्दा' नावाची तंबाखू आमच्याकडं खूप चालायची. तिच्या बोटासारख्या लांबट पॅकिंगला लोक 'तोटा' म्हणत.*
नक्की आठवत नाही, पण त्यावेळी तो तोटा १५ पैशांना मिळायचा...
*बळीराम बन म्हणायचा, "अभ्यास करताना तंबाखू खाल्ल्यानं झोप लागत नाही !"*

बळीरामला मळून देता देता मीही तंबाखू खायला लागलो. थोडा वेळ कैफ यायची, पण चुन्यानं मळलेली तंबाखू लागायची.. थोडा वेळ डोकं गुंग व्हायचं.. पण नरडं कोरडं पडायचं.. दाभाडाचं सालटं निघायचं !
त्यावरही बळीरामकडं सल्ला होता. तो म्हणायचा, "सुरुवातीला काही दिवस चुना न लावता खा !

*हळूहळू मला तंबाखूचं व्यसन लागलं !*

  सुरुवातीला अनेक दिवस बनजवळची तंबाखू खाल्ली.. नंतर जवळ ठेवायला लागलो...

नांदूरच्या आठवडी बाजारात गावरान तंबाखू मिळायची. दादा दर मंगळवारी बाजारातून तंबाखूची जुडी आणत. दुसऱ्या दिवशी आबा ती जुडी सोडत.. तंबाखूची लांबसडक पानं अडकीत्यानं कातरत, वाळवत आणि फडक्यात बांधून ठेवत...
दादा, आबा आणि दत्तूबप्पा आठवड्यात ती तंबाखू खाऊन टाकत !

बरेच दिवस 'मी तंबाखू खातोय' हे घरी कुणालाही माहीत नव्हतं. गावी असलो की माझी पंचायत व्हायची.. दुकानातून घ्यावी तर बोभाटा होईल, म्हणून मी घरातलीच तंबाखू चोरून खायचो...
पण म्हणतात ना, *"चोरी झाकत नाही, कधी ना कधी उघडी पडतेच !"*

एकदा एक घटना घडली...
गावरान तंबाखू आधीच खूप कडक असते.. त्यात शेतकऱ्याकडून फवारणी करताना किंवा नंतर प्रक्रिया करताना काहीतरी गडबड झाली.. आणि तंबाखू विषारी बनली ! दादा, आबा आणि बप्पाच्या पोटात दुखायला लागलं.. माझ्या तर पोटाचा आकडा झाला.. मुटकुळं करून झोपलो.. खोदून खोदून उलट्या केल्या.. तास दोन तासांनी बरं वाटायला लागलं..
पण *तंबाखुमुळं पोटात दुखलं हे सगळ्यांच्याच लक्षात आलं !*

*"व्यसन कोणतंही असो, ते जितक्या सहज लागतं.. तितक्या सहज सुटत नाही !"*

त्यातल्या त्यात तंबाखू सोडणं तर खूप कठीण काम, मी अनेकदा प्रयत्न केले, पण यश येत नव्हतं...

*२९ वर्षे तंबाखू खाल्ली..!*

१५ ऑगस्ट २०१९ ला.. हॉलीबॉलच्या मैदानावर तंबाखू खाणाऱ्या खेळाडूंना शशिकांत माने या मित्रानं 'तंबाखू सोडण्याचं' आवाहन केलं..
*मी संकल्प केला.. मन खंबीर बनवलं.. तेव्हापासून तंबाखू सोडली ती.. कायमची !*

*धन्यवाद मित्रा !*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

  

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य