दादा..! भाग - ६५
*दादा..!*
*भाग -६५*
पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतल्यानंतर एक आठवड्यानं डी.एड.ची यादी लागली. पहिल्याच यादीत ५ व्या क्रमांकावर माझं नाव होतं. *स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या बीडमध्ये असलेल्या अध्यापक विद्यालयात माझा नंबर लागला होता...*
*पॉलिटेक्निक करायचं का डी.एड?*
*पॉलिटेक्निक केलं तर, इंजिनिअर होता येईल.. पण चार वर्षे लागतील !*
*डी एड केलं तर.. दोन वर्षांत शिक्षक !*
घरच्यांचा कसलाही दबाव नव्हता, पण डी.एड. करणं काळाची गरज होती...
*परिस्थिती माणसाला अकाली शहाणं बनविते !*
मी पॉलिटेक्निकचं ऍडमिशन रद्द केलं, सगळी कागदपत्रं परत घेतली आणि डी. एडला ऍडमिशन घेतलं. तायडीनंही बीडच्याच अध्यापिका विद्यालयात ऍडमिशन घेतल्याचं समजलं !
दिवाळी जवळ आली होती...
*आबा, आई आणि काकू कारखान्याला जाणार होते, दादा घरी राहणार होते. घरोघरी नवीन कपडे, किराणा सामान आणण्याची लगबग सुरु झाली होती. आमच्या घरी सामानाची बांधाबांध चालली होती.* गावातली अजून तीन चार कुटुंब ऊस तोडायला जाणार होती, पण त्यांचे मुकादम आणि कारखाने वेगळे होते.
एके दिवशी सकाळी सकाळीच मुकादम घरी आले, आम्ही सगळे घरीच होतो. दारात एका बाजूला गिरणीच्या जात्याची फुटलेली अर्धी पाळी ठेवलेली होती, त्याला आम्ही 'लिशाना' म्हणायचो. महिन्या पंधरा दिवसाला आबा त्या लिशान्यावर कधी विळे, खुरपी तर कधी कुऱ्हाडी, अडकीत्याला धार लावत.. आज कोयत्याला धार लावत होते !
*मुकादम म्हणाले, "निघायच्या तयारीत राहा.. उद्या दिवस मावळायच्या टायमाला गाडी येईल, दिवाळीच्या पाडव्याला बॉयलर पेटणार आहे. दिवाळी फडावरच होईल..."*
*'दिवाळी फडावरच होईल...'*
*उकळलेलं तेल कानात ओतावं, तसे हे शब्द काळीज जाळत गेले. पोटात आगडोंब उसळला, पण त्याला ओठापर्यंतही आणता आलं नाही...*
न राहवून दादा म्हणाले, "आम्हाला वाटलं होतं, दिवाळी घरी होईल."
मुकादमानं नकारार्थी मान हलवली...
*दुसऱ्या दिवशी गाडी देवळापुढं येऊन उभी राहिली...*
आबानं गाडीत बैलं भरली, आम्ही सगळं सामानसुमान भरलं. सगळे गपगुमान आपापलं काम करत होते. *म्हातारी बाई भट्टीच्या घरात डोळ्याला पदर लावून बसली होती. कालपासून तिच्या डोळ्याचं पाणी तुटत नव्हतं. बालू, पिनू, आशा उगाचच मोठ्या माणसांच्या पायात घुटमळत होती. गावातली लोभाची माणसं वाटं लावायला वाहनाजवळ जमली होती, गल्लीतल्या बाया, गडीमाणसं दारात थांबली होती..*
सगळे जेवायला बसले...
*कुणालाच घास गिळत नव्हता.. पाण्याच्या घोटाबरोबर कसेबसे चार चार घास पोटात ढकलले...*
रात्रीचे दहा वाजले असतील...
*दादा, आबा काळजावर दगड ठेवून वाहनाकडं चालले होते. गल्लीतल्या आया, बाया आई, काकूच्या गळ्यात पडून रडत होत्या...*
जास्त वेळ थांबण्यात अर्थ नव्हता...
*आबा, आई, काकू गाडीत बसले.. गाडी चालू झाली तसा सगळ्यांनी एकच आक्रोश केला...*
*थोडा वेळ थांबून, खिन्न मनानं आम्ही घराकडं परतत होतो.. दूर कुठंतरी रेडिओवर लागलेलं गाणं थोडं थोडं ऐकायला येत होतं...*
*दिस जातील.. दिस जातील,*
*भोग सरल.. सुख येईल..!*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*