दादा..! भाग -६१

*दादा..!*

*भाग - ६१*

  अजीजपुरा, माळी गल्लीत तत्कालीन नगरसेवक एकनाथ शेरकर यांची दोन मजली इमारत होती. त्या इमारतीत माझी मावशी भाड्यानं राहायची. तिच्या ओळखीनं वरच्या मजल्यावरची एक रूम आम्हाला मिळाली, दुसऱ्याच दिवशी शाळा सुटल्यावर आम्ही आमचं चंबुगबाळ तिथं हलवलं...

  वसतिगृहात एका शाळेतले, एकाच वर्गातले, एकाच रूममध्ये आम्ही चौघेजण राहात होतो. मी आणि सुभाष बांगर नवीन होतो तर सुग्रीव मुंढे आणि अर्जुन घुमरे तिथं आठवी पासून होते. सकाळी दूध, नाष्टा आणि सकाळी - संध्याकाळी पोटभर जेवण मिळत असल्यानं माझा पोटाचा प्रश्न मिटला होता...
*आता फक्त अभ्यास एके अभ्यास !*

  सुभाष चलाख होता, तो दाखवायचा एक आणि करायचा दुसरंच ! रात्रीची जेवणं झाली की आम्ही अभ्यासाला बसायचो. सुभाष बिनधास्त झोपायचा, चांगली झोप घ्यायचा आणि पहाटं उठून अभ्यास करत बसायचा. आमच्या लक्षात आल्यावर आम्हीही त्याचाच कित्ता गिरवायला सुरुवात केली. लवकर झोपायचं आणि लवकर उठून अभ्यास करत बसायचं..
*म्हणतात ना, "लवकर निजे, लवकर उठे.. तया ज्ञान, संपत्ती आरोग्य लाभे !*

  वसतिगृहात आठवी ते बारावीची शंभरावर मुलं असतील, पण सगळ्यांची सगळी कामं कशी मस्तीत पण शिस्तीत चालायची ! आपापल्या शाळेच्या वेळेनुसार उरकण्याची सगळ्यांना घाई असायची...

   गेटच्या बाजूला पाण्याची भली मोठी टाकी होती, तिच्या दोन बाजूंना तोट्या बसविलेल्या होत्या. एका वेळी आठ दहा मुलं आंघोळी करू शकत...

*आम्ही चौघं.. टॉवेल गुंडाळून, हातात बादली.. बादलीत मग.. त्यात साबण घेऊन.. सकाळी सातच्या सुमारास दात घासत घासत आंघोळीला जायचो. बादली भरेपर्यंत तोंड धुवून व्हायचं, पण गार पाण्याचा 'पहिला मग' डोक्यावर ओतून घेताना अंगावर काटा उभा राहायचा. डोळं झाकून.. एका मागं एक.. तीन चार मग.. पटापटा डोक्यावर ओतून घेतले की, एका मोठ्या दिव्यातून पार पडल्यासारखं वाटायचं !*

पण खरी मजा यायची.. थंडीच्या दिवसांत !
*खाटकानं बोकडाला पुढं ओढावं.. त्यानं ओरडत आणि पाय खरडत त्याच्या मागं मागं चालावं.. तशी आंघोळीला जाताना आमची पावलं जड जड व्हायची !*

*कधी कधी तर इतकी थंडी वाजयची.. "ठंडे ठंडे पाणी से नहाना चाहीए.. हे गाणं म्हणताना सुद्धा थंडी वाजायची !*
आपण सगळीकडं आधी मला.. आधी मला म्हणतो, पण आंघोळीच्या वेळी मात्र आम्हाला आधी तू.. आधी तू म्हणायची वेळ यायची !

*मित्रानं तोंडाला साबण लावलेली असताना.. थंडगार पाण्यानं भरलेली बादली.. त्याच्या अंगावर भाssडकन ओतताना.. वेगळाच आनंद वाटायचा.. आणि त्यानं चिडून 'मग' फेकून मारला, की मग वेगळाच 'आनंद' भेटायचा !*

*शनिवारी मात्र आम्ही "गोटा स्नान" करायचो !*

काहीही असो,
*वसतिगृहात राहणं म्हणजे रोज सहलीचा आनंद घेण्यासारखं आहे !*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*



  

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य