दादा..! भाग - ६९

*दादा..!*

*भाग - ६९*

  *सृष्टीचं भव्य आणि रम्य सौंदर्य प्रत्यक्ष पाहायला सगळ्यांनाच आवडतं, नव्हे ती माणसाची सहजप्रवृत्ती आहे !* यातूनच माणसाला सहलीची कल्पना सुचली असेल...

सहल म्हणजे चैतन्य..!
*सहल म्हणजे उत्साह..!!*
सहल म्हणजे ताजेपणा..!
*सहल म्हणजे हवापालट..!!*
खरं तर..
*'सहल' या शब्दातच आनंद दडलेला आहे !*

*सहलीच्या आठवणी माणसाला आयुष्यभर हळव्या करतात.. मनातल्या मोरपिसासारख्या !*

डी. एड. च्या दुसऱ्या वर्षात आमच्या अध्यापक विद्यालयानं दोन उल्लेखनीय उपक्रम राबविले..
*पैठणची सहल आणि अध्यापन सप्ताह !*

*बीड ते पैठण.. दोन ते अडीच तासाचं अंतर !*
साठे सरांनी सगळं नियोजन केलं. औटी मॅडम आणि जगताप सरही सोबत होते. *राक्षसभुवन, आपेगाव, पैठण, जायकवाडी धरण आणि ज्ञानेश्वर उद्यान पाहायचं ठरलं. पुस्तकात पाहिलेली, वाचलेली आणि लोकांच्या तोंडून ऐकलेली ही ठिकाणं प्रत्यक्ष पाहण्याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती...*

   आम्ही सकाळी लवकरच बीड सोडलं.. गेवराई.. शहागड ओलांडताच औटी मॅडम सांगू लागल्या, *"गेवराई तालुक्यात पुढं गोदावरी नदीच्या तीरावर राक्षसभुवन नावाचं गाव आहे. या गावाला पुरातन तसेच ऐतिहासिक वारसा आहे. शनिदेवाच्या साडेतीन पीठांपैकी पहिलं पीठ तिथं आहे, तसंच दत्तप्रभूंचं जन्मस्थान म्हणूनही राक्षसभुवन प्रसिद्ध आहे. प्राचीन काळी ते स्थान दंडकारण्याचा भाग होतं. वनवास काळात प्रभू रामचंद्र दोन वेळा तिथं येऊन गेल्याचा उल्लेख पुराणात आहे."*

ऐकता ऐकता राक्षसभुवन आलं. तुडूंब भरलेलं गोदावरी नदीचं पात्र, घाट, पुरातन शनिमंदिर, दत्तप्रभूंचं जन्मस्थान अशी ठिकाणं बघून आम्ही एका ऐतिहासिक वेशीजवळ आलो...

मॅडम गंभीर होऊन बोलू लागल्या, *"१४ जानेवारी १७६१ रोजी झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठी सैन्याचा दारुण पराभव झाला. सदाशिवराव पेशवे, विश्वासराव, इब्राहीमखान, जनकोजी शिंदे.. अशी मराठ्यांची कर्ती पिढीच मारली गेली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराण्यातला एक तरी वीर धारातीर्थी पडला.. प्रेतांचे खच पडले.. ९० हजार स्त्रियांना आणि मुलांना गुलाम बनविण्यात आले.. मोठी दुर्दशा झाली, पण हटतील ते मराठे कसले? अवघ्या अडीच वर्षांत.. १० ऑगस्ट १७६३ साली थोरल्या माधवराव पेशव्यांच्या नेतृत्वात मराठयांनी हैदराबादच्या निजामाचा सडकून पराभव केला. साडेतीन शहाण्यांपैकी एक असलेला निजाम सेनापती विठ्ठल सुंदर याला इथंच गाडला. २२ सरदार कैद केले.. पानिपतचा कलंक पुसून टाकला ! मराठी सैन्याचा स्वाभिमान आणि कणा पुन्हा बळकट झाला.. तो याच बीड जिल्ह्याच्या भूमीत ! ही 'राक्षसभुवनची लढाई' म्हणून इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली गेली !"*

औटी मॅडम आवेशानं बोलत होत्या.. आम्ही भारावून ऐकत होतो !

*क्रमशः..*

              *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य