दादा..! भाग - ७३

*दादा..!*

*भाग - ७३*

  *लग्नानंतर आशा, अपेक्षांना नवे पंख फुटू लागले, पण वास्तवाचे भान होताच स्वप्नांचे इमले आपोआप कोसळू लागले...*
काय करणार???
भगवान विद्यालयातली नोकरीची संधी गेल्यानंतर दुसऱ्या अनेक ठिकाणी अर्ज केले, मुलाखती दिल्या.. पण बोलावणं आलं नाही. जिल्हा परिषदेनंही शिक्षक भरती केली नाही. खरं तर *दादांना संस्थेतली नोकरी नकोच वाटायची. ते म्हणत, "खाजगी संस्थेत लई हांजी, हांजी करावी लागते. सरकारी नोकरी सुखाची.. कुणाचं एक नाही, दोन नाही !"*

*दोन वर्षे बेकारीत गेली...*
माझं वाचन, लेखन मात्र चालूच होतं. पहिली ते सातवीची सगळी पुस्तकं मी पुन्हा वाचली. जनरल नॉलेजचंही एक पुस्तक घेतलं होतं. वर्तमानपत्र मात्र कधीतरी वाचायला मिळायचं...

*१९९१ हे साल नव्या संधी घेऊनच उजाडलं !*
वर्षाच्या सुरुवातीलाच प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळाची जाहिरात निघाली. विभागाच्या मुख्य ठिकाणी त्याची कार्यालये होती. मराठवाड्याचं कार्यालय औरंगाबादला होतं. तिथं जाऊन अर्ज भरावा लागणार होता.

माझ्याकडं एक सुती, जाड धाग्याची शबनम होती. तिला दोन्ही बाजूंनी जोडलेला लांबलचक बंद होता. तो बंद खांद्याला लटकवला तरी शबनम कमरेपर्यंत यायची ! महत्वाच्या कागदपत्रांची फाईल कायम त्या शबनम मध्ये ठेवलेली असे.
*ढगळ सदरा, फूटभर बॉटम असलेली पॅन्ट, पायात निळ्या रंगाची पॅरागॉन चप्पल आणि गळ्यात शबनम.. कुठंही निघालं की, असा माझा लूक असायचा !*

'जेवण केल्याशिवाय घर सोडायचं नाही' हा आबांचा दंडक, आणि परगावी निघालं की बारीक घडी करून एक शाल शबनम मध्ये ठेवायलाही ते विसरत नसत.

औरंगाबाद मी कधीच बघितलं नव्हतं, तरीही एकटाच निघालो. डी एडचा वर्गमित्र बळीराम बन बीडच्या स्टँडवर भेटला. १९८९ साली उस्मानाबाद जिल्ह्यानं एस टी प्रवर्गाचा अनुशेष भरला, त्यात तो भूम तालुक्यात लागला होता. त्याचा चुलत भाऊ अंगद औरंगाबादला बजाज कंपनीत कामाला होता. तो सिडको वसाहतीत राहायचा. त्याची आणि माझीही तोंडओळख होती. बळीरामनं त्याचा पत्ता दिला आणि म्हणाला, "उशीर झाला तर त्यांच्याकडं मुक्कामाला जा."

लोकांना विचारत, विचारत निवड मंडळाचं ऑफिस शोधलं आणि बीड जिल्ह्यासाठी फॉर्म भरला.
*बोलक्या माणसाला जगाच्या पाठीवर कुठंही, कसलीही अडचण येत नाही !*

  सगळं व्यवस्थित झालं, पण सिडको बसस्टँडवर परत यायला चांगला अंधार पडला. दिवसभर वणवण फिरून कंटाळा आला होता, भूकही खूप लागली होती. विचारपूस करत अंगद बनचं घर शोधलं, आणि तिथं मुक्काम केला...
अंगदही खेडयातलाच.. पण नोकरीच्या निमित्तानं शहरवाशी झालेला. तो, त्याची पत्नी आणि छोटा मुलगा असं छोटंसं कुटुंब !
त्यांचं टापटीप मधलं राहणं..
   *माझा गावंढाळ अवतार !*
त्यांचं नेमकं बोलणं..
    *माझं एरंढाचं गुऱ्हाळ !!*
त्यांचं मोजकं खाणं, लटकं हसणं..
   *माझं मात्र दणकून खाणं आणि खळखळून हसणं !!!*

*खूप अवघडल्यासारखं वाटलं !*
पण काय करू?
चार वर्षे बीड शहरात राहिलो, शिकलो पण खेडवळ राहणं, वागणं आणि बोलणं बदललं नाही...
*स्वभावाला कुठं औषध असतं?*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*


Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य