दादा..! भाग - ७०

*दादा..!*

*भाग - ७०*

  *जरतारी पदरावर नाचरा मोर विणणाऱ्या गर्भश्रीमंत, रेशमी पैठणीचं शहर.. पैठण !*
*अवघ्या महाराष्ट्रावर ज्यांच्या भारुडांचं गारुड आहे, त्या संत एकनाथांचं.. पैठण !!*
*आशिया खंडातलं सर्वांत मोठं मातीचं धरण उशाला घेऊन सुखानं नांदणारं.. पैठण !!!*

पैठणच्या जवळच आपेगाव आहे...
*"जो जे वांच्छील, तो ते लाहो" असं म्हणत विश्वातील चरचरांसाठी पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचं हे जन्मगाव !*
माऊलींच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन आम्ही जायकवाडी धरण गाठलं...

६० किलोमीटर लांब आणि १० किलोमीटर रुंद इतका मोठा पसारा असलेलं जायकवाडी धरण ! *दुरदूरपर्यंत.. सपाट जमिनीवर.. उथळ बशीसारख्या रुपात.. अथांग पसरलेला नाथसागर डोळ्यांत मावत नव्हता ! धरणाची भव्यता, दिव्यता आणि सुंदरता पर्यटकांना तसेच देशी, विदेशी पक्ष्यांनाही आकर्षित करत होती. जलाशयातल्या बेटांवर क्रेन, फ्लेमिंगो, पिंटेल पक्षी मुक्तपणे संचार करत होते !*

साठे सर सांगू लागले, "खरं तर, हैद्राबादच्या निजामाचं राज्य असताना बीड जिल्ह्यातल्या जायकवाडी गावाजवळ धरण बांधण्याची योजना आखण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर मराठवाड्याची तहान भागावी, शेती फुलावी, उद्योग धंद्यात वाढ व्हावी यासाठी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नानं पैठण जवळ हे धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. धरणाची जागा बदलली, पण 'जायकवाडी धरण' हे नाव कायम राहिलं ! *धरणाची पायाभरणी त्या वेळचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते झाली तर उदघाटनाच्या निमित्तानं इंदिरा गांधींचे पाय या मातीला लागले !"*

  भल्या मोठ्या भरावावर उभं राहून आम्ही कितीतरी वेळ धरणाचं आणि भोवतालच्या परिसराचं सौंदर्य न्याहाळीत होतो ! जलौघाचा मनसोक्त आनंद घेत होतो ! उघडलेल्या दरवाज्यातून फेसाळत जाणाऱ्या जलप्रतापाचा नाद मनात भरून ठेवत होतो...

बघता बघता दुपार झाली. सर्वांनाच कडाडून भुका लागल्या होत्या. जलाशयाच्या बाजूला लिंब, आंबा, जांभूळ, चिंच, शिसम, सुबाभूळ आणि उंबराची अगणित झाडं होती. त्या झाडांच्या सावलीत गोलाकार पंगत बसली आणि सर्वांनी आपापले डबे सोडले...
*माझ्यासाठी वर्गातल्या माझ्या एका मैत्रिणीनं डबा आणला होता !*

जेवणं झाली. गप्पा, गाणी आणि भेंड्यांचा खेळात बराच वेळ गेला...
संत एकनाथ महाराजांचं समाधी मंदिर, त्यांच्या राहत्या, भव्य, चौसोपी तटबंदीतील सागवानी वाड्याचं मंदिरात केलेलं रूपांतर, दत्त मंदिर अशा अनेक ठिकाणांना भेटी देऊन दिवस मावळायच्या आधी आम्ही ज्ञानेश्वर उद्यानाकडं आलो.

*म्हैसूरच्या वृंदावन गार्डनच्या धर्तीवर उभारलेलं.. सुमारे ४०० एकरवर पसरलेलं ज्ञानेश्वर उद्यान ! भव्य प्रवेशद्वार.. पर्यटकांसाठी तयार केलेल्या पक्क्या पायवाटा.. गर्द हिरवी झाडं.. त्यांना दिलेले आकर्षक आकार.. वेगवेगळी फुलझाडं.. त्यांवर उमललेली रंगीबेरंगी फुलं !*
*काय पहावं? किती पहावं??*
*का नुसतंच मऊ मऊ हिरवळीवर लोळत राहावं???*

*जो तो मन मानेल तसा आनंद घेत होता !*

अंधार होऊ लागताच वेगवेगळ्या रंगांच्या असंख्य दिव्यांनी उद्यान प्रकाशित झालं.. *कृत्रिमरीत्या तयार केलेला छोटासा धबधबा प्रवाहित झाला.. उद्यानाच्या मधोमध तयार केलेला पाण्याचा पाट शांतपणे वाहू लागला.. त्यात आकाशातला चंद्रही आनंदानं पोहू लागला.. चांदण्यांच्या प्रकाशात, अवखळ संगीताच्या तालावर नाचणाऱ्या कारंज्यासोबत आमच्याही मनातले मोर थुईथुई नाचू लागले.. उतरत्या पायऱ्यांवरून खळखळ वाहणारं पाणी सप्तरंगी दिसू लागलं, तेव्हा ज्ञानेश्वर उद्यान पृथ्वीवरील स्वर्ग भासू लागलं !*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य