दादा..! भाग - ७४

*दादा..!*

*भाग -७४*

  *'संध्याकाळची जेवणं सगळ्यांनी मिळून करायची' हा आमच्या घरचा अलिखित नियम !* जेवणं झाली की दादा, आबा पान-तंबाखू खात बसत. जेवणात 'विशेष' काही असलं की आबा आम्हा मुलांनाही पानं लावून देत. पुरणपोळीचा बेत असला की बायांचाही विडा तयार होई. मग गप्पा रंगत. बोलता बोलता कधी आमच्या अभ्यासाचा, कधी गुराढोरांचा तर कधी शेतातल्या कामाचा विषय निघे...
दादा म्हणत, "आम्ही खूप लहान होतो, तेव्हा आमच्यावर शेतीच्या कामाची जबाबदारी पडली. पाळी घालताना, पेरताना आम्हाला एकेकट्याला औत, तिफन उचलत नसायची. अक्षरशः आम्ही दोघं मिळून औत उचलायचो आणि वसन काढायचो, पण आम्ही शेत पडू दिलं नाही नि घरचंही अडू दिलं नाही !"

*आबा सांगत, "बाहत्तरचा दुष्काळ तुम्हाला कळत नसंल. तुम्ही लै लहान लहान व्हतात. गुरांना खायला, प्यायला होतं.. पण लोकांची लै आबदा झाली. खायालाच काही नव्हतं.. लोकांनी खडी फोडली.. सुकडी खाल्ली, इलू मिलू खाल्लं.. कधी कधी तर बरबडा खाऊन दिवस काढलं."*

दादा मध्येच म्हणत, "बरं ते राहू द्या, तेव्हा आम्हाला शिकता आलं नाही, आता तुम्ही तरी चांगलं शिका !"

खरंच होतं,
*दादा थोरले होते, ते चौथीपर्यंत शिकले. आबा धाकटे.. ते तर शाळेतच गेले नाहीत !*

काळ पुढे सरकला...
लिहिता वाचता येत असल्यानं दादा कारभारी झाले. खव्याच्या धंद्यामुळं त्यांना नेहमी कळंब, बार्शीला जावं लागायचं. कधी सोलापूरला तर कधी पुण्याला जावं लागायचं. चार चौघांत वावरल्यानं त्यांना अनेक चांगले वाईट, अनुभव आले. माणसांच्या खतखोडी समजल्या. खरं सांगायचं तर, *दादांनी पुस्तकं कमी वाचली असतील पण माणसं जास्त वाचली होती ! त्यांनी गणितं कमी सोडवली असतील पण जीवनातली कोडी जास्त सोडवली होती ! दादा व्यवहारात कुशल होते. तोंडी हिशोबात पटाईत होते. धोरणी होते, संयमी होते आणि दक्षही होते !*
*दादा "दादा" होते !*

*औरंगाबादहून परतल्यावर दोन दिवसांनी दादांनी मला पुण्याला पाठवलं. पुणे विभागाचाही फॉर्म भरायला लावला.* शिवाजीनगर भागात प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळाचं ऑफिस होतं. तिथं जाऊन मी सोलापूर जिल्ह्यासाठी फॉर्म भरला. परत आल्यावर दादांना मी सहज विचारलं, "दादा, सगळीकडं एकाच दिवशी परीक्षा होणार आहे, मग दोन ठिकाणी का फॉर्म भरायला लावले?"

*दादा म्हणाले, "कोणती वेळ कशी येईल, सांगता येत नसतं. नेहमी हातचा राखून वागलं पाहिजे."*

....आणि झालंही तसंच,
आमचं गाव आडवळणी ! वाहनांची कसलीही सोय नव्हती. बीडकडं जायचं असलं की लोकांना शिरूरला चालत जावं लागायचं आणि कळंब, बार्शीला जायचं असलं की बहुल्याला ! गावात पोस्ट ऑफिसही नव्हतं. शिरूरचा पोस्टमन दोन तीन दिवसांची टपालं एकत्र आणून द्यायचा...
आता नेमकी तारीख आठवत नाही, पण उन्हाळ्यात एका रविवारी निवड मंडळाची लेखी परीक्षा होती. चार दिवस आधी पुणे निवड मंडळाचं तसं पत्रही आलं. सोलापूरला हरिभाई देवकरण प्रशालेत परीक्षा होती. *आम्ही औरंगाबाद विभागाच्या पत्राची वाट बघत होतो, पण भरवशाच्या म्हशीनं लाथा माराव्यात तसं झालं. शनिवार उजाडला, तरी औरंगाबादचं पत्र आलं नाही.*

आता सोलापूर शिवाय पर्याय नव्हता, तिथं मुक्कामी जावं लागणार होतं. लहानपणी बैलगाडीनं येडाईच्या जत्रेला येरमाळ्याला जायचो, त्याच्यापुढं कधी जाणं झालं नव्हतं. दादांना सोलापूरची बऱ्यापैकी माहिती होती, म्हणून ते सोबत निघाले...

पुन्हा तीच शबनम,
पुन्हा तीच चप्पल होती !
*अनोळखी रस्त्यावर,*
*स्वप्नांची उकल होती !!*
जरी नवा मुलुख,
थोडा जुनाच लोभ होता !
*सोसलेल्या वेदनांचा,*
*आता कुठे हिशोब होता !!*

सोलापूर जिल्ह्यासाठी परीक्षा द्यावी लागेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं !
पण, होतं कधी कधी असंही...
*आपण ठरवतो एक आणि घडतं वेगळंच !*

*क्रमशः..*

              *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य