दादा..! भाग -७५

*दादा..!*

*भाग - ७५*

  *चैत्र म्हणजे गावकऱ्यांना गावगाड्यातून आणि शेतकऱ्यांना शेतीच्या रगाड्यातून थोडी मोकळीक देणारा महिना !*
*चैत्र म्हणजे सुगी संपवून, धान्य वाळवून आणि उन्हाळकामं उरकून बायकांना थोडीशी उसंत देणारा महिना !*
*चैत्र म्हणजे गावोगावच्या यात्रा, जत्रांचा महिना !* तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून परिचित असलेल्या येरमाळ्याच्या येडेश्वरीची चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरते, ती पाच दिवस चालते...

येडाईची यात्रा आली की गावातल्या आराधी मंडळींचा आनंद ओसंडून वाहायचा. कपाळभर मळवट, देवीची माळ, परडी आणि गळ्यात कवड्याच्या माळा घातलेले आराधी-आराधीन "आई राजा उदो उदो" चा जयघोष करत येरमाळ्याची वाट धरायचे. आवडत्या गाण्यांच्या चालीवर रचलेली देवीची गाणी ठेक्यात म्हणताना भक्तांच्या अंगात ताल भरायचा.

  *बैलगाडीनं येडाईच्या यात्रेला जाताना आम्हाला भारी मज्जा वाटायची. डोईवर चैत्राचं रणरणतं ऊन असलं तरी मनाला हिरवी पालवी फुटायची !*
*चुना वेचून देवीच्या पालखीवर उधळताना प्रवासाचा सगळा शीण निघून जायचा. रहाट पाळणे, खाऊंची आणि खेळण्यांची दुकाने पाहून आमचा जीव आनंदी व्हायचा !* यात्रेत लाखोंची गर्दी असली तरी पाव्हणे आवर्जून भेटायचे आणि मुक्कामाचा आग्रह धरायचे.

  *येरमाळ्याच्या जवळच उपळाई नावाचं गाव आहे. दादा, आबांचं ते आजोळ ! दुसऱ्या बाजूला रत्नापूर, तिथं त्यांची मावस बहीण दिलेली ! मामा-भाच्यात आणि मेहुण्या मेहुण्यांत आपुलकी होती. सर्वांच्या गावांत अंतर असलं तरी सर्वांच्या अंतरात गोडी होती. दोन्हीकडं आमचे दोन-दोन मुक्काम होत. दिवसभर यात्रेचा आनंद आणि रात्री पाहुण्यांचा पाहुणचार ! असं चार दिवस चाले.* कित्येक वर्षे यात खंड पडला नाही. येरमाळ्याच्या बसस्टँडवर बसल्या बसल्या लहानपणीच्या या रम्य आठवणींत मन न्हाऊन निघालं !

  येरमाळा ते सोलापूर अडीच तीन तासाचं अंतर ! दुपार टळून गेली तरी गाडीत बसू वाटत नव्हतं. चैत्राच्या उन्हानं तापलेली हवा अंग भाजून काढीत होती. गाडीनं वेग घेतला तेव्हाच थोडं बरं वाटायला लागलं. दादांना सगळा भाग परिचित होता. उस्मानाबाद जवळ आलं, तसं दादा म्हणाले, "उस्मानाबादचं खरं नाव धाराशिव आहे. हैदराबादच्या निजामानं स्वतःच्या नावावरून उस्मानाबाद नाव ठेवलं, असं म्हणतात. सरकारी दरबारी उस्मानाबाद असलं तरी खेड्यापाड्यातली लोकं धाराशिवच म्हणतात. पुढं तुळजापूर आहे. तुळजाभवानीचं माहात्म्य आणि शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाबद्दल मी काय सांगू? तू पुस्तकात वाचलं असेलच?"

मी होकारार्थी मान हलवली...

सोलापूर येईपर्यंत दिवस मावळून गेला होता. निवड मंडळाच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यावर नक्की प्रश्न येतील असं मला वाटायचं, म्हणून तिसरीचं 'आपला सोलापूर जिल्हा' हे पुस्तक घेतलं. भागवत टॉकीजच्या परिसरात एक साधं लॉज होतं, तिथं आम्ही मुक्कामाला गेलो. खव्याच्या कामासाठी दादांना नेहमी सोलापूरला यावं लागायचं. कधी कधी त्यांचा मुक्काम पडायचा, तेव्हा ते तिथंच थांबत.

दिवसभराच्या प्रवासानं हातपाय गळून गेले होते. घामानं अंग रापलं होतं. भुकेनं पोटात खड्डा पडला होता. सोबत चार भाकरी होत्या, पण जेवण्यात वेळ घालविण्यापेक्षा सोलापूर गाठणं महत्वाचं होतं...

  लॉजवर गेल्यानंतर पहिल्यांदा मी गोटास्नान केलं. मग शबनम मधलं भाकरीचं गठुडं काढून सोडलं. भाकरीवर मधोमध घातलेल्या चटणीत बाजूचं लोणचं मिसळलं होतं. चटणीवरचं तेल भाकरीतून फडक्यापर्यंत पाझरलं होतं. भाकऱ्या मऊ, लालसर आणि अधिकच चवदार झाल्या होत्या. जेवता जेवता दादा म्हणाले, *"घराबाहेर पडताना पदरात दोन भाकऱ्या बांधून घेतल्या की पोटासाठी दुसऱ्याच्या हाताकडं बघावं लागत नाही !"*

*रात्री उशिरापर्यंत मी आपला सोलापूर जिल्हा वाचत होतो, दादाही जागेच होते. माझ्यासोबत दादांचीही परीक्षा सुरू होती !*

*क्रमशः..*
              *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य