दादा..! भाग - ७६

*दादा..!*

*भाग - ७६*

  *ज्या दिवसाची जवळपास दोन वर्षे वाट पाहिली तो दिवस उगवला होता ! ज्या सोनेरी स्वप्नांचे रोज इमले बांधले, त्या स्वप्नांना मूर्तरूप देण्याची वेळ जवळ आली होती.*
*आज निवड मंडळाची परीक्षा होती...*
आमच्या कुटुंबात सरकारी नोकरी लागण्याइतकं शिक्षण घेतलेला तेव्हा मी पहिलाच होतो. माझ्याकडं सगळ्यांच लक्ष होतं. मनात आलं, 'दादा सोबत आहेत, पण मला परीक्षा चांगली जावी म्हणून घरी काकू, आबा, आई, म्हातारी बाई आणि बायकू देव पाण्यात घालून बसले असतील.'
मला टेन्शन आलं होतं. मी गप्प गप्प होतो. दादांनी ते ओळखलं...
म्हणाले, "कसली काळजी करतोय?"

"............" मी

"सगळं व्यवस्थित होईल." दादांच्या शब्दांनी थोडं हलकं वाटायला लागलं. त्यांच्या पाया पडलो आणि आम्ही हरिभाई देवकरण प्रशालेच्या दिशेनं निघालो. सकाळची वेळ असूनही ऊन चांगलंच चटकत होतं. त्याला कोवळं म्हणावं की कडक असा प्रश्न पडत होता. प्रशालेच्या बाहेर, मैदानात परगावाहून आलेली मुलं मुली, त्यांचे नातेवाईक जमले होते. *३५० जागांसाठी १५०० पेक्षा जास्त मुले परीक्षा देणार आहेत, अशी जमलेल्या लोकांत चर्चा होती.* परीक्षेची वेळ व्हायला अजून दोन तास वेळ होता. दादा म्हणाले, "श्री सिद्धेश्वराचं मंदिर इथून जवळच आहे, दर्शन घेऊन येऊ."

  *चहुबाजुंनी पाणी असलेल्या तलावाच्या मध्यभागी बेटासारखं दिसणारं श्री सिद्धेश्वराचं पवित्र मंदिर म्हणजे सोलापूरचं वैभवच ! मकरसंक्रांतीला तिथं मोठी यात्रा भरते, तिला 'गड्ड्याची' यात्रा म्हणतात. अतिशय शांत आणि सुंदर परिसरातील सिद्धारामेश्वराच्या समाधीच्या दर्शनानं मन प्रसन्न झालं !*

अर्धा तास आधी घंटा झाली...
परीक्षार्थींना आत घेतलं, इतरांना बाहेर काढलं. बाहेर जाताना दादांच्या जीवाची घालमेल चालली होती.

*आत परीक्षा सुरू होती आणि बाहेर प्रार्थना !*

दादा बाहेर माझी वाट बघत होते. त्यांचं सारं लक्ष माझ्याकडंच होतं...
पेपर कसा होता? परीक्षा कशी गेली ??
त्यांनी विचारलं नाही पण मला राहवलं नाही, "मी म्हणालो, "दादा, पेपर चांगला गेला."

दादा म्हणाले, "तुझ्याकडं बघून मला ते समजलं."

*बापाचं असंच असतं, काळजी घेतात पण सांगत नाहीत. काळजी करतात पण दाखवत नाहीत !*

  पेपर अपेक्षेपेक्षा चांगला गेला होता. मण दोन मणाचं डोक्यावरचं ओझं खाली उतरल्यासारखं वाटत होतं. भर दुपारची वेळ झाली होती. ऊन मी म्हणीत होतं. आम्ही रिक्षानं बसस्टँड गाठलं. *आपसूकच आमचे पाय रसवंती गृहाकडं वळले. एका लयीत वाजणाऱ्या घुंगराच्या आवाजानं माझं लक्ष वेधून घेतलं. संगीताच्या तालावर चरख्यात ऊस पुन्हा पुन्हा घातला जात होता, पुन्हा पुन्हा पिळला जात होता. खाली ठेवलेल्या भांड्यात रसाची धार लागली होती. उन्हानं अंगाची लाही लाही झालेले प्रवासी थंडगार रसाच्या घोटानं तृप्त होत होते.*

माणसाचं जीवनही असंच असतं ना...
*'आपल्या' माणसांच्या मुखात सुखाचे चार घास जावेत म्हणून कर्ता माणूस संसारचक्रात पुन्हा पुन्हा पिळून निघत असतो !*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य