दादा..! भाग - ७७

*दादा..!*

*भाग - ७७*

  बीडच्या शिवाजीनगर भागात सरस्वती विद्यालय नावाची शाळा आहे. उत्तम पवार सर तिचे संस्थापक ! त्यावेळी ती शाळा ७ वी पर्यंत होती. मे महिन्यात मी तिथं मुलाखत दिली आणि माझी निवडही केली. *जून १९९१ मध्ये महिना ५०० रुपये पगारावर मी तिथं हजर झालो. त्यावेळी नवीन शिक्षकांना जवळपास २००० रुपये पगार होता. मला पगार कमी होता, पण मी "शिक्षक" झालो, याचा आनंद जास्त होता.. धन्यवाद सर !*

  *जुलै महिन्यात पुणे प्रादेशिक दुय्यय सेवा निवड मंडळाचं मुलाखतीचं (तोंडी परीक्षा) पत्र आलं.* सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात (सर्किट हाऊस) मुलाखत होणार होती. घरादाराला आनंद झाला. *खेड्यात कोणतीही गोष्ट जास्त दिवस लपून राहात नाही. ही तर आनंदाची गोष्ट होती. आनंद वाटला की वाढतो, असं म्हणतात. आम्ही आनंद वाटू लागलो. तीन चार दिवसांत सगळीकडे आनंदी आनंद झाला.* लोक येत, कौतुक करत. आम्हाला बरं वाटायचं...

*काही तज्ज्ञांनी 'आगाऊ' माहिती द्यायला सुरुवात केली, आणि आमचा आनंद ओसरायला सुरुवात झाली !*
ते सांगू लागले, "२०० गुणांच्या लेखी परीक्षेत जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना २५ गुणांच्या तोंडी मुलाखतीला बोलावलं जातं. त्याप्रमाणे तुम्हाला बोलावलं आहे. पण *'एका जागेसाठी तीन उमेदवार' बोलावले जातात. ज्यांची 'वर'पर्यंत ओळख असते, ज्यांचे नातेसंबंध असतात किंवा जे 'जोर' लावतात त्यांचीच निवड होते !"*

दादा, आबांना तज्ज्ञांचं म्हणणं पटू लागलं, काहीतरी हालचाल केली पाहिजे असं त्यांना वाटू लागलं. हलगर्जीपणामुळे भगवान विद्यालयातली नोकरी गेली होती, आता गाफील राहून त्यांना माझी सरकारी नोकरी गमावायची नव्हती.
मी म्हणायचो, "लेखी परीक्षेत मला चांगले गुण मिळाले असतील, नियमानुसार मुलाखत होईल आणि माझी निवड होईल."

पण *दादा रिस्क घ्यायला तयार नव्हते. ते म्हणत,"दूध पोळले आहे, आता ताकही फुंकून पिलं पाहिजे."*

मी म्हणायचो, "दादा, निवड मंडळाचं ऑफिस पुण्यात आहे, तिथं आपल्या ओळखीचं कुणी नाही. चोरांची भरती करू नका."

....पण *हार मानतील ते दादा कसले? "जोर" नसताना त्यांनी जोर लावायला सुरुवात केली !*

दादांचे प्रयत्न सुरू होते, पण यश येत नव्हतं.
दरम्यान मुलाखतीचा दिवस उजाडला. बहुला मुक्कामी असणारी सकाळी ६:३० ची कळंब गाडी आम्ही गाठली. ११ च्या सुमारास सर्किट हाऊसला पोहोचलो. *लेखी परीक्षेतील गुणांनुसार फलकावर याद्या डकवल्या होत्या. ११७ व्या क्रमांकावर माझं नाव होतं !*

  रत्नापुरचे सुनील जाधवर नाहोलीला शिक्षक होते. ते नातेवाईक होतेच पण त्यापेक्षाही माझे चांगले मित्र होते, अजूनही आहेत. महत्वाच्या वेळी मी त्यांचा सल्ला घ्यायचो. मुलाखतीचा मला चांगला अनुभव होता, तरीही त्यांनी बजावलं, *"हॉलमध्ये गेल्यानंतर मुलाखत घेणाऱ्या साहेबांना नमस्कार करायचा. घाबरायचं नाही. तिथं खुर्ची ठेवलेली असते पण त्यांनी सांगितल्याशिवाय बसायचं नाही. मोजकं बोलायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं, एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसलं तरी 'मला येत नाही,' असं म्हणायचं नाही."*

तासाभरात मुलाखतींना सुरुवात झाली. तिघेजण मुलाखत घेत होते...
एकानं नाव?
दुसऱ्यानं गाव?
तिसऱ्यानं सोलापूर जिल्ह्यातील तालुके? सीना नदीवरील धरण?
असे पटापट चार पाच प्रश्न विचारले. सर्वच प्रश्न सोपे होते.

*माझी मुलाखत चालू होती आणि दादा 'वर' लिंक लागते का ते शोधत होते !*

*क्रमशः...*

               *श्री राजेंद्र गिते,बार्शी.*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य