दादा..! भाग - ८०
*दादा..!*
*भाग - ८०*
*भेंड्याचं औषध घेतल्यापासून माझी कावीळ उताराला लागली होती पण मला अजून जेवण जात नव्हतं !* नाहोलीची भामा आत्या, मोहन मामा, बहुल्याचे दादांचे काका, मावशी असे जवळचे नातेवाईक भेटून गेले. उपळाई, रत्नापूर लांब आहे, तिथल्या पाहुण्यांना अजून माहित झालं नव्हतं. *संपर्काची साधनं नव्हती, भेटी झाल्या तरच एकमेकांची सुखदुःखं समजत होती.*
सोमवारी कळंबचा बाजार असतो. मला कावीळ झाल्याचं उस्मानभईंनी सातेफळच्या जनाआत्याला सांगितलं. ती लगेचच राजेगावला आली. दादांना म्हणाली, "काविळीच्या औषधासाठी इतक्या लांब कशाला जायचं ? मला माहीत आहे औषध, तीन दिवसांत गुण येतो !" त्याच दिवशी आत्या मला सातेफळला घेऊन गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आत्यानं झाडलोट, सडा सारवण उरकलं. गावाजवळच त्यांचं शेत आहे. तिथंच गुरांचा गोठा होता. कांदे मामा दूध घेऊन आले होते, पण ते जर्शी गाईचं दूध होतं. आत्यानं शेजारून तांब्याभर गावरान गाईचं दूध आणलं. येता येता एरंडाची चार पानं आणली. चूल पेटवली, दूध तापायला ठेवलं आणि मला उठवून तोंड धुवायला लावलं...
तोंड धूत धूत मी आत्याकढं बघत होतो. एरंडाच्या पानांची देठं काढून आत्यानं ती पानं स्वच्छ पाण्यानं धुतली. अंगणात एका बाजूला उखळ होतं, कापडाचा बोळा घालून ते झाकलं होतं. भिंतीच्या कोपऱ्यात ठोंब्या उभा करून ठेवला होता. घराची राखण करणाऱ्या पहारेकऱ्यासारखा तो भासत होता ! त्याच्या बाजूला पाटा वरवंटा होता.
*आत्यानं पाटा वरवंटा धुवून घेतला, फडक्यानं पुसून घेतला. दोन्ही पायांच्या अंगठ्यात पाटा घट्ट पकडला आणि वरवंट्यानं ती पानं वाटू लागली. पानं वाटताना आत्या मागं पुढं हलत होती. तिची मान एका लयीत डुलत होती ! बाजूला गेलेला चोथा ती अधूनमधून हातानं गोळा करीत होती, वरवंट्यानं ती पुन्हा पुन्हा वाटीत होती. मनासारखं वाटून झाल्यावर तिनं सगळा चोथा एका वाटीत गोळा केला, त्यात दोन चमचे पाणी घातलं. ते वाटण फडक्यात घालून पिळलं. चांगला अर्धा कप रस काढला !*
एरंडाच्या पानाचा हिरवागार अर्धा कप रस आणि गावरान गाईचं ग्लासभर दूध माझ्यापुढं ठेवत आत्या म्हणाली, "डोळं झाकून ह्यो रस प्यायचा आणि वरून हे दूध प्यायचं."
*रस कडू होता, पण मी घटाघटा घोटला !*
*एरंडाच्या कडू रसाचा गुण मात्र गोड आला !*
दुपारी मला कडकडून भूक लागली. दुधासोबत ज्वारीची एक भाकरी खाल्ली...
*चरख्यात ऊस पुन्हा पुन्हा पिळून काढावा तसं काविळीनं मला पिळून काढलं होतं. भेंड्याच्या आणि आत्याच्या उपचारानं मी बरा झालो.* कळंबला आणून आत्यानं मला नवीन कपडे घेतले आणि राजेगावात आणून सोडलं.
*...आणि तो दिवस उजाडला !*
*जागून ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी !* असंच काहीसं झालं...
*१६ ऑगस्ट १९९१,*
*थोरामोठ्यांचे आशीर्वाद कामी आले. दादांची तपश्चर्या फळाला आली. आबा, आई, काकू, बाईच्या कष्टाचं चीज झालं. अंधाराचं कवच भेदून तो शुक्रवारचा सूर्य वर आला. त्याची सोनेरी किरणं सगळ्या पृथ्वीतलावर पसरली. त्यातल्याच काही किरणांनी माझं आयुष्य प्रकाशमान केलं !*
*'प्राथमिक शिक्षक' म्हणून निवड झाली होती !* पंचायत समिती, करमाळा येथे १० दिवसांत हजर व्हायचं होतं, निवड मंडळाचा तसा आदेश मला मिळाला होता.
*'तो' आदेश मिळताच दादांनी मला मारुतीला नारळ फोडण्याचा आदेश दिला !*
*घरातलं वातावरण भारल्यासारखं झालं होतं. बायकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. दादा, आबांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. आपल्यालाच नोकरी लागली आहे, असं प्रत्येकाला वाटत होतं. सर्वांचे चेहरे उजळले होते. मी तर हिरो झालो होतो !*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*