दादा..! भाग - ८१

*दादा..!*

*भाग - ८१*

  *प्रभू जाधव, सुरेश कोळी, उस्मानभई, अशोक मेटे, रामहरी मेटे अशा कितीतरी कुटुंबांचा आणि आमचा चांगला लोभ होता. आमच्या कोणत्याही कामात, कार्यात हे सगळे आमच्यापुढं असत. मन लावून काम करत..झटत, दादाही त्यांना जपत. सगळेच आमच्या गल्लीतले, शेजारचे, जवळचे नव्हते पण सगळे 'जवळ' होते !*
सकाळी जेवणाच्या आधी आणि रात्रीची जेवणं झाल्यानंतर आमच्या दारापुढच्या फरशीवर सगळे जमत. एकमेकांच्या कामांची चौकशी करत. पान, तंबाखू खात खात गप्पा रंगत. *अडलेल्यांची शे-पाचशेची गरज सहज भागवली जायची, नडलेल्यांची बैल बारदाण्याची नड लगेच सोडवली जायची. आनंद वाटला जायचा..दुःख वाटून घेतलं जायचं !*

  आज बहुतेक सगळे जमले होते. सगळे आनंदात होते आणि त्यांच्या आनंदाचं कारण होतो 'मी' !
*'सगळं घर-दार आनंदात असतं आणि त्या आनंदाचं कारण आपण असतो तेव्हा लै भारी वाटतं, नाही का?'*
पण म्हणतात ना,
*'माणूस आनंदाचे घट घटाघटा पितो आणि दुःख मात्र चघळीत बसतो.'*
माझं तसंच झालं होतं...

*नोकरी लागल्याचा आनंद होताच पण दादांनी हांडे साहेबांना १५ हजार रुपये दिल्याची सल मनात सलत होती !* न राहवून मी म्हणालो, "दादा, तुम्ही पैसे द्यायला नको होते."

*दादा म्हणाले, "झालेल्या जखमा खाजवीत बसल्यानं भरून येत नाहीत, उलट जास्त चिघळतात."*

दादांनी विषयच संपवला...

  नाहोली, बहुला, शिरूर, सातेफळ ही पाहुण्यांची गावं अगदी जवळ आहेत. उपळाई, रत्नापूर ही गावं थोड्या अंतरावर आहेत. *सुखदुःखाच्या प्रसंगी सगळे पाहुणे आवर्जून जमत. गावात अंतर असलं तरी 'अंतरात' अंतर नव्हतं !*
रत्नापुरचे सुनील जाधवर गुरुजी त्यापैकीच एक ! त्यावेळी ते नाहोलीला शिक्षक होते. जवळचे नातलग असले तरी मला ते मित्र जास्त वाटत. *मला नोकरीची ऑर्डर आल्याचं गुरुजींना समजलं. दुपारच्या सुट्टीत पेढे घेऊन ते राजेगावला आले, सर्वांना पेढे वाटले. नोकरी मला लागली होती, मित्र पेढे वाटीत होते !*

ऑर्डर वाचून गुरुजी म्हणाले, "दहा दिवसांत करमाळा पंचायत समितीला हजर व्हायला सांगितलं आहे पण तू उद्याच हजर हो, *नोकरीत seniority खूप महत्वाची असते..."*

गावापासून बार्शी तालुका जवळ आहे, करमाळा दुप्पट लांब आहे ! मी गुरुजींना म्हणालो, "बार्शी तालुका मिळाला असता तर  किती बरं झालं असतं, जायला यायला जवळ पडलं असतं."

*गुरुजी म्हणाले, "महाराष्ट्रात असा एकही तालुका नसेल, जिथं बार्शीचा शिक्षक नाही पण बार्शी तालुक्यात बाहेरचा एकही शिक्षक नसेल. बार्शी तालुका शिक्षकांची खाण आहे !"*

  आधी कधीही मी करमाळ्याला गेलो नव्हतो, तरीही दादांना म्हणालो, "उद्या मी एकटा करमाळ्याला जातो आणि हजर होऊन येतो."

अनेकांना मी करमाळ्याला जाण्याचा मार्ग विचारला. कुणी सांगायचं पाटोदा..जामखेड मार्गे जवळ आहे, कुणी सांगायचं बार्शी..परंडा मार्गे जवळ आहे. *सगळे एक मात्र नक्की सांगत.. करमाळ्याला चांगला, धोपट रस्ता आणि आणि थेट गाडीही कुठुनही नाही !*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२