दादा..! भाग -८७
*दादा..!*
*भाग - ८७*
*"शाळा" हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय ! 'विद्यार्थी म्हणून' शाळेचा पहिला दिवस कदाचित प्रत्येकाला आठवणार नाही पण 'शिक्षक म्हणून' पहिला दिवस शिक्षक कधीही विसरणार नाहीत !*
पहिल्या शाळेविषयी वाटणारी आत्मीयताही प्रत्येक शिक्षकाच्या अंतरात लपलेली असतेच असते...
तब्बल दहा दिवसांनी.. २७ ऑगस्टला मला रावगाव केंद्रातल्या लिंबेवाडी शाळेची आणि सातपुतेला राखवाडी शाळेची ऑर्डर मिळाली. *एका जिल्ह्यातल्या, एका तालुक्यातल्या आम्हा दोघांना एका केंद्रातली गावं मिळाल्याचं समाधान होतं.*
*रावगाव.. करमाळ्याहून दहा किलोमीटर अंतरावर असलेलं, कर्जत रोडवरचं सोलापूर जिल्ह्यातलं शेवटचं गाव !* रावगावच्या पुढं दोन अडीच किलोमीटर अंतरावर शेगुड नावाचं गाव आहे. ते नगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात येतं.
आम्हाला रावगावच्या केंद्रशाळेत हजर व्हायला सांगितलं होतं. शाळा कुठं आहे? असं आम्हाला कुणालाही विचारावं लागलं नाही. *स्टँडवर उतरताच पाठमोरी, दोन्ही बाजूंनी उतरत्या पन्हाळी पत्र्यांची, जुन्या धाटणीची, दिमाखात उभी असलेली शाळेची भव्य इमारत दिसली.* मुख्य इमारतीत पाच वर्गखोल्या, दोन्ही बाजूंनी नवीन बांधलेल्या स्लॅबच्या दोन दोन वर्गखोल्या, समोर खेळाचं मैदान, चारही बाजूंनी संरक्षक भिंत आणि आकर्षक प्रवेशद्वार ! *गावाच्या नावाला शोभावी अशीच रावगावची शाळा दिसली !*
जेवणाची सुट्टी झाली होती. मुलांच्या किलबिलाटानं शाळा गजबजली होती. समोरच मोठया अक्षरात "कार्यालय" असं लिहिलेलं होतं. आत जाऊन आम्ही उभं राहिलो. जेवणं उरकून शिक्षक मंडळी गप्पागोष्टीत रमली होती. आम्ही अवघडून उभं राहिलेलं जुन्या जाणत्या शिक्षकांच्या अनुभवी नजरेनं बरोब्बर हेरलं. कमी उंचीचे, सडपातळ बांध्याचे एक गुरुजी उठले. धोतर आवरत, मुख्याध्यापकाच्या खुर्चीकडे जात म्हणाले, "राम राम, नवीन शिक्षक ना?"
"होss.." एका सुरात आमच्या तोंडून शब्द बाहेर पडला.
"बसा ना, उभे का..." गुरुजींच्या मऊ बोलण्यानं आम्हाला बरं वाटलं.
मी दोघांचे नेमणूक आदेश त्यांच्याकडं दिले आणि पुन्हा जागेवर जाऊन, हात बांधून उभा राहिलो. गुरुजींनी आदेश दोनदा दोनदा वाचले. चष्मा काढून टेबलवर ठेवला आणि आमच्याकडं प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं.
मी नाव, गाव सांगितलं.
सातपुतेनंही स्वतःचा संपूर्ण परिचय करून दिला....
आम्ही परिचय देत असताना जवळपास सहा फूट उंचीचे, गोरेपान, पांढरेशुभ्र धोतर, तीन गुंडयांचा शर्ट आणि टोपी घातलेले गुरुजी अधूनमधून व्वा, छान, गुड म्हणून प्रतिसाद देत होते.
आमची नजर सर्वांचे अनोळखी चेहरे न्याहाळीत होती...
त्या गुरुजींच्या हे लक्षात आलं असावं. ते म्हणाले, *"मी वि. श्री. डुकरे.. जवळच वस्तीवर राहतो. हे वंजारवाडीचे वि. भ. बिनवडे.. केंद्रीय मुख्याध्यापक आहेत. हे शेगुडचे ध. श्री. शेगडे, हे रावगावचेच भा. धो. जौंजाळ, ते पल्याड पान खात बसलेले वाघमारेवस्तीचे च. भा. वाघमारे, ह्या काझी बाई आणि हे सु. ज्ञा. मुळे.. हे दोघे बार्शीचे आहेत."* डुकरे गुरुजींनी सगळ्यांचा परिचय करून दिला.
"आम्हाला जोडीदार कोण आहेत?" सातपुतेनं सहज विचारलं.
"तुम्ही दोघंही स्कूलमास्तर आहात..."
"स्कूलमास्तर.. म्हणजे???" मी.
*"स्कूलमास्तर म्हणजे.. एक शाळा-एक मास्तर !"* कुणीतरी मध्येच स्पष्टीकरण दिलं.
*सातपुते मटकन खाली बसला...*
डुकरे गुरुजींच्या ते लक्षात आलं. म्हणाले, "दोन्ही वाड्या इथून जवळच आहेत. तिथली माणसंही खूप चांगली आहेत, मायाळू आहेत. *मजेत राहायचं, आनंदानं शिकवायचं ! काळजी करायची नाही. तक्रार येईल असं वागायचं नाही !* जूनपासून दोन्ही शाळांना शिक्षक नव्हते. आम्ही केंद्रातल्या शिक्षकांनी आळीपाळीनं दोन्ही शाळा संभाळल्याच की !"
*डुकरे गुरुजींचं बोलणं साखरेसारखं गोड होतं, पण 'स्कूलमास्तर' पद आमच्या डोक्यावर स्वार होतं !*
...तोपर्यंत बिनवडे गुरुजींचं 'हजर रिपोर्ट' लिहून झालं होतं.
डुकरे गुरुजी म्हणाले, *"इथून अडीच तीन किलोमीटरवर लिंबेवाडी आहे. गप्पा गोष्टी करत, मजेत चालत जाऊ.. तुम्हाला चार्ज देतो. म्हणजे कसं.. तुम्ही मोकळं.. मीही मोकळा !*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*