दादा..! भाग - ८२
*दादा..!*
*भाग - ८२*
*१७ ऑगस्ट १९९१, शनिवार होता. शनीच्या साक्षीनं आज बेकारीच्या पीडा दूर सारायच्या होत्या. करमाळा पंचायत समितीला "शिक्षक" म्हणून हजर व्हायचं होतं. शिक्षण सेवेचा आज खऱ्या अर्थानं श्रीगणेशा करायचा होता !*
करमाळा.. सव्वाशे किलोमीटरचं अंतर ! बसनं जायचं.. हजर होऊन परत यायचं. मनावर मणामणाचे दोन दगड ठेवल्याचं दडपण आलं होतं !
शिरूर - बीड गाडी सकाळी साडेसातला हालायची. पाच किलोमीटर चालत जाऊन गाडी गाठली. *साडेसातची गाडी साडेसाती घालविणार होती !* त्या गाडीनं मांजरसुंभ्यापर्यंत गेलो. पुण्याकडं जाणाऱ्या गाडीनं जामखेडला पोहोचलो तेव्हा अकरा वाजून गेले होते. जामखेड ते करमाळा ४२ किलोमीटरचं अंतर ! गाड्या भरपूर होत्या पण रस्त्याची बोंब होती...
करमाळा गाडीची जास्त वेळ वाट बघावी लागली नाही. जामखेड सोडून गाडी झिक्रीच्या रस्त्याला लागली. *झिक्रीचा वळणावळणाचा रस्ता.. गाडी सहज वळत होती.. मन हेलकावे घेत होतं ! धोंड पारगावचा रस्ता नावासारखाच होता.. दगडधोंड्याचा ! गाडी आदळत होती..आपटत होती, मनात धडधड वाढत होती !!*
*नान्नजचा चढ चढून आणि जवळ्याचा उतार उतरून गाडीनं सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला, तेव्हा बारा वाजून गेले होते ! पोथऱ्याचा शनिदेव निराशेच्याही बारा वाजविणार होता !!*
*पोथरं ओलांडताच उंच उंच दीपमाळा खुणावू लागल्या. कमलादेवी मंदिराचा कळस दिसला. किती चढउतार सोसले तेव्हा हा दिवस दिसला !*
करमाळा आला तसा जीव मोठ्ठा झाला...
*भाग गेला, शीण गेला |*
*अवघा झाला आनंद ||*
खरंच,
हा आनंद पोटात मावत नव्हता...
*कमलाईच्या पावन नगरीत पहिलं पाऊल टाकलं, तेव्हा एक वाजून गेला होता ! करमाळा नगरी जणू आनंदानं काठोकाठ भरलेला एक पेला होता !!*
करमाळा..
*सुनियोजित, सुंदर शहर,*
*कमलाभवानीचं नगर !*
*आखीव, रेखीव रस्ते,*
*सुखाचं, आनंदाचं आगर !!*
बसस्टँडच्या बाहेर पडलो...
रस्त्यावरच्या एका माणसाला सहज विचारलं, "पंचायत समिती कुठं आहे?"
तो माझ्याजवळ आला आणि हातानं दाखवीत म्हणाला, "या रस्त्यानं सरळ पुढं जायचं. उजव्या हाताला करमाळा नगर पालिकेची इमारत लागेल. तिथून तीन रस्ते फुटतात. एक कर्जतकडं जातो, दुसरा पुण्याकडं आणि तिसरा डाव्या हाताचा रस्ता सरळ पंचायत समितीकडं जातो...
*अनोळखी रस्ता होता,*
*अनोळखी गाव होते !*
*रस्त्यावरच्या माणसांचे,*
*ओळखीचे भाव होते !!*
नगर पालिकेच्या समोर, पंचायत समितीकडं जाण्याच्या रस्त्याला एक झेरॉक्स सेंटर होतं. मला मूळ प्रमाणपत्रांच्या आणि काही महत्वाच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स काढायच्या होत्या. फाईलमधले कागद काढून मी देत होतो, झेरॉक्स काढणाराच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. झेरॉक्स काढून झाल्यावर ते म्हणाले, "बीड जिल्ह्यातले का?"
मी होकारार्थी मान हालवली.
"शिक्षक म्हणून हजर व्हायला आले का?"
मी, "हो...." म्हणालो.
ते म्हणाले, "माझं नाव दिलीप भुजबळ, माझे वडील बलभीम भुजबळ अंबेजोगाई तालुक्यात शिक्षक होते. तिथल्या माणसांनी त्यांना खूप सांभाळलं. *बीड जिल्ह्यातली माणसं खरंच खूप चांगली आहेत. काही अडलं नडलं तर सांगा, नक्की मदत करीन ! दिलीप भुजबळ यांच्या आपुलकीच्या, आधाराच्या चार शब्दांनी मानसिक बळ आलं.*
पंचायत समितीच्या शिक्षण विभागात गेलो, माने साहेब गटशिक्षणाधिकारी होते. माझ्या आधी अनेकजण हजर झाले होते. मीही 'हजर व्हायचं' सगळं सोपस्कार पार पाडलं. तासभर थांबलो आणि "सोमवारी येतो," असं सांगून परतीच्या प्रवासाला लागलो...
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*