दादा..! भाग - ८४

*दादा..!*

*भाग - ८४*

  आषाढात भरभरून पडलेल्या पावसानं वसुंधरा तृप्त झाली होती. नद्यांना आलेले पूर आता ओसरले होते पण ओढे, नाले अजून खळखळून वाहात होते.

*श्रावण सुरू होता...*
सायंकाळची वेळ होती. मी आणि सूर्यकांत सातपुते कमलादेवीच्या दर्शनाला निघालो होतो. करमाळा शहर ते कमलादेवीचं मंदिर हे जवळपास एक किलोमीटरचं अंतर. कधी कोवळं ऊन तर कधी ढगांची सावली असा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. मधूनच एखादी पावसाची हलकी सर सूर मारून जात होती पण आम्ही नेटानं चालत होतो. रस्त्याच्या बाजूंची शेतं हिरवीगार झाली होती. मंदिराच्या भोवतालचा परिसरही पिकांनी बहरून गेला होता.

खरंच,
*श्रावण म्हणजे हर्ष, उत्साह व उत्सवांचा महिना ! सृष्टीच्या कणाकणात आणि प्राणिमात्रांच्या मनामनात नवचैतन्य निर्माण करणारा महिना !*

श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे.

*बालकवींच्या कवितेतला श्रावण प्रत्यक्षात भूतलावर अवतरल्यासारखं वाटत होतं. झाडं, फुलझाडं टवटवीत झाली होती. रंगीबेरंगी फुलांनी वातावरण सुगंधीत झालं होतं ! धरती हिरव्या रंगानं रंगली होती ! सुर्यफुलाची छोटी छोटी पिवळी फुलं मावळत्या सूर्याला वंदन करीत होती ! उडदाच्या इवल्या इवल्या झाडांना शेंगांचे घोसच्या घोस लोंबकळताना दिसत होते. मुगाच्या शेंगा खायला आल्या होत्या. मक्याच्या कणसांतून कुरळे केसरी केस बाहेर आले होते ! रानावनातून आणि मातीच्या कणांतून जीवन पाझरताना दिसत होतं ! सारी सृष्टीच जणू नव्या नवरीसारखी नटली होती !*

  शाळा सुरू होऊन अडीच महिने झाले होते. चाळीस शिक्षक हजर होऊन आठवडा उलटला होता, पण शिक्षण विभागातला घोळ मिटला नव्हता. आम्हाला अजून गावं दिली नव्हती.
कुणाला कुठं टाकायचं?
यावर पुढारी आणि अधिकारी यांच्यात अजून एकमत झालं नव्हतं !

शिवाजी साबळे, नीलकंठ हनपुडे, जनार्दन घाडगे, सुभाष मंगवडे, नानासाहेब मोहिते, असे बहुतांश शिक्षक तालुक्यातीलच होते. बीड जिल्ह्यातून मी, सूर्यकांत सातपुते, लातूर जिल्ह्यातून मनोहर असे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच शिक्षक बाहेरचे होते.

  ज्यांची घरं शहरात होती, ज्यांची गावं शहराच्या जवळ होती ते मुक्कामाला घरी जात. राहण्याची सोय नव्हती असे आम्ही आठ दहा जण एकत्र आलो. गटशिक्षणाधिकारी मा माने साहेबांना भेटलो. त्यांना अडचण सांगितली. साहेबांनी विलास जाधव गुरुजींना बोलावून घेतलं. त्यावेळी ते करमाळा तालुका प्राथ.शिक्षक सह.पतसंस्थेचे चेअरमन होते. त्यांनी पतसंस्थेच्या एका खोलीत आमची राहण्याची सोय केली. बसस्टँडच्या समोर होनप बंधुचं "विश्वास" नावाचं हॉटेल होतं. तिथं पंधरा रुपयांत राईस प्लेट मिळायची. बाजूलाच सुधीर महाजनाचं 'महेश पान सेंटर' होतं.
*शिक्षक पतसंस्थेत मुक्काम करायचा, विश्वास हॉटेलमध्ये जेवायचं, सुधीर महाजनच्या टपरीवर पान खायचं आणि पंचायत समितीला हजेरी लावायची.. असा आमचा दिनक्रम चालू होता !*

  पंचायत समितीच्या परिसरात लिंब, चिंच, गुलमोहर अशी वेगवेगळ्या प्रकारची बरीचशी झाडं होती. त्या झाडांखाली आम्हाला दिवसभर बसून राहावं लागायचं, कारण सकाळी अकरा आणि सायंकाळी पाचच्या सुमारास आमची हजेरी घेतली जायची.

  आज ऑफिस आवारानंतरच आम्ही निघालो आणि *निसर्ग सौंदर्याचा अविष्कार बघत, डोळ्यांत साठवीत कमलादेवी मंदिराच्या पायऱ्यांजवळ येऊन पोहोचलो...*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*






Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य