दादा..! भाग - ८६
*दादा..!*
*भाग - ८६*
पंचायत समिती समोर, आजूबाजूच्या झाडांखाली, हॉटेलात बसून बसून कंटाळा आला होता. रविवारी राखीपौर्णिमा होती, शनिवारी दुपारून मी गावाकडं निघालो. सूर्यकांत सातपुतेही सोबत होता. तोही केज तालुक्यातलाच.. युसुफ वडगावचा !
कळंबपर्यंत दोघं मिळून आलो. करमाळ्याहून परंडा मार्गे बार्शी आणि बार्शीहून दुसऱ्या गाडीनं कळंबला येईपर्यंत दिवस मावळला. *कळंबहून साडेसहाला बहुल्याला मुक्कामी गाडी असायची. ती बहुल्याला "मुक्कामाच्या" हिशोबानंच निघायची !*
*दुसरं वाहन नव्हतं....*
रात्री नऊच्या सुमारास गाडी बहुल्यात आली. तिथून राजेगाव फक्त दोन किलोमीटर आहे, पण रात्रीचं एकट्यानं जायला भीती वाटायची. *मांजरा नदीच्या पुढं दोन वाटा होत्या.. एक गाडीवाट दुसरी पाऊलवाट ! गाडीवाट थोडी लांबून, ओढ्यानाल्याच्या बाजूनं जाणारी तर पाऊलवाट पिकांतून !*
*मी पाऊलवाटेनं निघालो...*
*रात्रीची वेळ.. आभाळात ढगांची गर्दी होती ! पौर्णिमा उद्यावर आली होती तरी चंद्राचा कुठंच पत्ता नव्हता ! दोन्ही बाजूंनी उभी पिकं.. अंधारात वाट अंधुक दिसत होती ! कधी धावत.. कधी झपझप चालत होतो.. काळीज धडधडत होतं ! आपल्याही पावलांचा आवाज येऊ नये असं वाटत होतं. कुठं काही वाजलं तरी काळजात धस्स होत होतं. धडधडतं काळीज तळहातावर घेऊन जात असल्यासारखं वाटत होतं. उभं अंग घामानं न्हालं होतं !*
पहिल्या अनुभवानंच अद्दल घडवली..
अवेळी घरी आलेलं बघून आबांनीही चांगलंच झापलं. म्हणाले, *"इथून पुढं लक्षात ठीव, एखाद्या आठवड्यात गावाकडं नाही आलं तरी चालंल पण येताना लवकर निघायचं अन दिवस मावळायच्या आत घरी पोचायचं !"*
*रविवारी रक्षाबंधन होतं...*
भामाआत्या, जनाआत्या सवड असली तर सगळ्यांना राख्या घेऊन येत नाहीतर हस्ते परहस्ते पोहोच करत.
दादांनी नांदूरच्या बाजारातून दहा राख्यांची एक पट्टीच आणली होती. राख्या साध्याच होत्या. खाली मऊ, गोलाकार, चमकदार कागद.. त्यावर जाडसर, गोल स्पंज.. त्यावर छोटासा, नक्षीदार कागद आणि हे सगळं दोऱ्यानं मण्यात गुंतवून पुठ्याला बांधलेलं !
सकाळी सगळ्यांच्या अंघोळी झाल्या...
*आशानं पुठ्याच्या राख्या सोडून एका ताटात मांडल्या. दिवा लावला. एका वाटीत तांदूळ, दुसऱ्या वाटीत साखर घेतली. कपात कुंकू घेतलं.. त्यात थोडं पाणी घालून ते बोटानं कालवलं. काकूनं गव्हाच्या पिठाचं दोन मुटकं करून दिलं आणि पाट मांडला...*
*आम्ही बारीबारीनं पाटावर बसायचो.. आशा करंगळीच्या शेजारच्या बोटानं उभा गंध लावायची. बोटं फडक्याला पुसून चिमटीनं गंधावर तांदूळ लावायची.. ओवाळून राखी बांधायची.. साखरेनं तोंड गोड करून पाया पडायची !*
*आशा.. पाच भावांत एकटी बहीण ! सगळ्यात लहान.. पण सगळं कसं निगुतीनं करायची !*
रविवारी दिवसभर रानातल्या रानमेव्याचा भरपूर आनंद घेतला आणि सोमवारी पुन्हा करमाळ्याचा रस्ता धरला.
हजर होऊन दहा दिवस झाले होते. दुपारी साडेतीन चारची वेळ असेल. आम्ही ग्रुप ग्रुपनं झाडांखाली बसलो होतो. गप्पा रंगल्या होत्या..
घाडगे म्हणाला, "मला...गाव मिळणार आहे."
मोहिते म्हणाला, "मला...गाव मिळणार आहे."
*अनेकांनी आपापल्या गावचे पुढारी, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यामार्फत गावासाठी वशिला लावला होता. अधूनमधून ते पुढारी पंचायत समितीत येत आणि "...याला इथं टाका, ...त्याला तिथं टाका." असं तावतावानं सांगून जात.*
*आमची कोणाशीही ओळख नव्हती...*
इतक्यात *गोरा रंग, पांढरं शुभ्र धोतर, सोनेरी रंगाचा नेहरू शर्ट, कडक पांढरी टोपी आणि उंचीला साजेशी तब्येत असलेले, पन्नाशी ओलांडलेले एक पुढारी हातात धोतराचा खोसा धरून आमच्या दिशेनं आले. जवळ येताच त्यांनी, "यातलं राजेंद्र गिते कोणंय?" म्हणून विचारलं.* अचानक उद्भवलेल्या प्रसंगानं मी थोडा गडबडलो, उभा राहिलो...
"तुला रायगाव केंद्रात घेतलंय.. लिंबेवाडीला."
मी मानेनंच संमती दाखवली.
"रायगाव केंद्रात अजून एक जागाय.. राखवाडीला ! कुणाला यायचंय का?"
सूर्यकांत सातपुतेनं माझ्याकडं बघितलं. मी म्हणालो, "ह्याला यायचंय.. ह्याला घ्या."
"सांग नाव..."
सातपुतेनं संपूर्ण नाव सांगितलं. त्यांनी नाव लिहून घेतलं आणि निघून गेले.
शिवाजी साबळे म्हणाला, *"कर्जत रोडला रावगाव आहे. त्या रावगावचे हे पुढारी आहेत.. नवनाथ तात्या केकान. रावगाव केंद्रात लिंबेवाडी, राखवाडी या वाड्या आहेत. रावगावला लोकं 'पाण्याचं रायगाव' असंही म्हणतात !"*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*