दादा..! भाग -८५
*दादा..!*
*भाग - ८५*
*करमाळ्याची कमलाभवानी म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीचं प्रतिरूप ! हे मंदिर करमाळ्याचं वैभव आहे.. श्रद्धास्थान आहे ! कमलाभवानी करमाळ्याची स्फूर्तिदेवता आहे !*
दगडी पायऱ्यांची चढण चढून आम्ही देवीच्या मंदिरात प्रवेश केला. *मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची पाच फूट उंचीची.. पूर्णाकृती.. काळ्या गंडकी शिळेत कोरलेली मूर्ती आहे. सिंहावर आरूढ असलेली, हातात त्रिशूळ आणि तलवार धारण केलेली अष्टभुजादेवी महिषासुराचं निर्दालन करीत आहे...*
*देवीच्या दर्शनानं आमच्या डोळ्यांचं पारणं फिटलं !*
मंदिरात देवदेवतांची सुरेख शिल्पचित्रे कोरलेली आहेत. आवारात होमासाठी कट्टा व उंचच उंच तीन दीपमाळा आहेत. दीपमाळांवर जाण्यासाठी आतून पायऱ्या आहेत. मंदिराला दुहेरी तटबंदी असून तटबंदीच्या आतील बाजूस भक्तांसाठी ओवऱ्या आहेत. बाहेर निंबाळकर वंशजांच्या अप्रतिम शिल्पे असलेल्या छत्र्या आहेत. त्यावरील नक्षीकाम पाहण्यासारखं आहे. त्याबाहेर स्थापत्यशास्त्राचा अद्वितीय नमुना असलेली शिवलिंगाच्या आकाराची विहीर आहे. मंदिर आणि मंदिराचा परिसर पाहून आम्ही भारावून गेलो.
मंदिराचा इतिहास जाणून घेण्याची आमच्या मनात तीव्र इच्छा होती. ओवऱ्यात काही जुनी जाणती माणसं बसली होती, आम्ही त्यांना बोलतं केलं. त्यांच्याकडून मिळालेली माहिती अशी...
*सूफी संत करमेमौला यांचं करमाळ्यात वास्तव्य होतं. त्यांच्या 'करमेमौला' या नावावरून या गावाला "करमाळा" नाव पडलं, असं सांगितलं जातं.*
दुसरा एकजण पुढं सांगू लागला...
*फलटणचे महादजी नाईक निंबाळकर म्हणजे शिवरायांचे जावई ! संभाजी महाराजांच्या बहीण सखुबाई या त्यांच्या पत्नी. महादजींचे नातू रंभाजी निंबाळकर यांची कारकीर्द हैदराबादच्या निजामशाहीत खूप गाजली. १७०७ ला औरंगजेबाच्या निधनानंतर शाहू महाराजांची सातारा व ताराराणी बाईसाहेबांची कोल्हापूर अशा स्वराज्याच्या दोन गाद्या तयार झाल्या. दोन्ही गाद्यांच्या अंतर्गत वादाला कंटाळून काही मराठे सरदार हैदराबादच्या निजामाला जाऊन मिळाले यात रंभाजी निंबाळकरही होते. हैदराबादच्या निजामाचा महाराष्ट्रातला मुख्य आधार म्हणजे हे निंबाळकर घराणं. रंभाजींच्या पराक्रमानं खूश होऊन निजामानं त्यांना "रावरंभा" ही पदवी व करमाळा, माढा, दौंड, बारामती, तुळजापूर, भूम, खर्डा इथली जहागिरी दिली. या रावरंभा घराण्यातले रंभाजी, जानोजी, आनंदराव, बाजीराव, खंडेराव यांच्यासारखे पराक्रमी पुरुष शेवटपर्यंत निजामशाहीत राहिले. या घराण्याला युद्धकलेबरोबरच साहित्य, कला, सौंदर्यदृष्टी याचंही वरदान होतं. शिवाजी महाराजांचं कुलदैवत म्हणजे तुळजापूरची आईभवानी. रावरंभा रंभाजी निंबाळकर बरेच वर्षे तुळजापुर येथे वास्तव्यास होते. ते देवीचे उपासक होते. त्यांनी तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार केला, म्हणून मुख्य प्रवेशद्वाराला 'सरदार निंबाळकर दरवाजा' म्हणतात. नंतर रावरंभा निंबाळकर यांनी माढ्याच्या माढेश्वरीचं आणि करमाळ्याच्या कमलादेवीचं मंदिर बांधलं. त्यांचे पुत्र जानोजीराव निंबाळकर यांनी कमलाभवानी मंदिराला दाक्षिणात्य पद्धतीची गोपुरे बसविली.*
असं म्हणतात की, *रावरंभा निंबाळकर यांच्या करमाळा जहागिरीमध्ये ९६ खेडी होती, त्यामुळे ९६ या अंकाला कमलादेवी मंदिरात विशेष महत्त्व आहे. मंदिर ९६ खांबावर उभारलं आहे, मंदिरापर्यंत जाण्यासाठी ९६ पायऱ्या आहेत ! मंदिरात देवदेवतांची ९६ चित्रशिल्पे असून मंदिरात ओवऱ्याही ९६ आहेत ! स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या मंदिर परिसरातील हत्ती बाव विहीरीला देखील ९६ पायऱ्या आहेत. एवढंच काय दीपमाळांतील पायऱ्यांची संख्याही ९६ च आहे !*
*९६ हा अंक ९६ कुळी मराठा समाजातील ९६ कुळांशी संबंधित असून तो अंकशास्त्राच्या दृष्टीने विश्वास आणि परोपकाराशी नातं जोडणारा आहे, असंही सांगितलं जातं !*
*मंदिर उंच टेकडीवर उभारलं आहे. मंदिरातील भव्यदिव्य दीपमाळा प्रज्वलित केल्यानंतर त्याच्या ज्वाला करमाळा जहागिरीतील ९६ गावांतून स्पष्टपणे दिसत होत्या, अशी दंतकथा आहे !*
दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला कमलादेवीची मुख्य यात्रा भरते. रोज देवीचा छबिना निघतो. शेवटच्या दिवशी म्हणजे चतुर्थीला निघणारा छबिना वैशिष्ट्यपूर्ण असतो.
रावरंभा निंबाळकर व जानोजीराव निंबाळकर यांनी कमलादेवी मंदिराबरोबरच करमाळ्यात भुईकोट किल्ला बांधला. दक्षिणोत्तर अंडाकृती आकाराचा हा किल्ला १५ एकरवर पसरलेला आहे. गडाच्या तटबंदीत एकूण एकवीस बुरुज आहेत. *किल्ल्याच्या तटबंदीनं संपूर्ण गावालाच आपल्या कवेत घेतले होतं पण आता किल्ल्यात वाढलेल्या गावानंच किल्ल्याचा घास घेतला आहे !*
*क्रमशः..*
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*