दादा..! भाग - ८८

*दादा..!*

*भाग - ८८*

    *रावगाव ते लिंबेवाडी जेमतेम तीन किलोमीटरचं अंतर ! चढ-उताराचा आणि आडवळणाचा कच्चा रस्ता.. रस्त्यावर घट्ट रुतून बसलेले छोटे मोठे दगडगोटे.. त्यांची मऊ, गुळगुळीत झालेली डोकी.. त्या डोक्याच्या बाजूनं हळूच डोकं वर काढणारी गवताची हिरवी पाती.. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कुठं येड्या बाभळीची तर कुठं बोराटीची काटेरी, खुरटी झुडपं.. आजूबाजूला जाड्या, भरड्या, तांबड्या मातीची खडकाळ, मुरमाड जमीन.. त्यात जेमतेम वाढलेली आणि कशीबशी तग धरुन उभी असलेली उडीद, मूग आणि सुर्यफुलाची पिकं आणि त्या पिकांच्या भोवताली वाढलेलं केणा आणि कुर्डूचं उचलतण.. नजर जाईल तिथपर्यंत असंच चित्र होतं !*

  डुकरे गुरुजींना सगळे आप्पा म्हणत. आप्पा झपझप चालत होते. *मानेवर असलेलं चार्जचं अदृश्य जोखड झुगारून देण्याची आप्पांना घाई होती तर नव्या मुलुखात.. नव्या शाळेत.. जुन्या स्वप्नांना.. नव्यानं उजाळा देण्यासाठी मी उत्सुक होतो !* शबनम आवरून आणि स्लीपर सावरून त्यांच्यासोबत चालताना माझी तारांबळ उडत होती. मी घामाघूम झालो होतो. आप्पा म्हणाले, *"रावगाव परिसरातल्या अर्ध्याअधिक जमिनी अशाच हलक्या आहेत. आज कितीही पाऊस पडला तरी उद्यापर्यंत माती कोरडी ठाक पडते."*

न राहवून मी म्हणालो, *"आप्पा, तरीही लोकं रावगावला  'पाण्याचं रायगाव' का म्हणतात?"*

माझा प्रश्न आप्पांना अनपेक्षित होता. एक मोठा सुस्कारा सोडत ते म्हणाले, *"रावगावचं कागदोपत्री ना 'रावगाव' असंच आहे. लोकं बोलताना 'रायगाव' म्हणतात आणि 'पाण्याचं रायगाव' म्हणण्यामागं एक रंजक घटना आहे."*

*"रंजक घटना???" मी कुतुहलानं विचारलं.*

*"हो, रावगावच्या उत्तरेला यशोमाता देवीचं मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला एक विहीर आहे. अनेक वर्षांपासून त्या विहिरीचं पाणी गावकरी वापरत नव्हते. त्या पडक्या विहिरीच्या काठावर, आजूबाजूला अनेक झाडं, झुडपं उगवली.. छोट्या- मोठ्या वनस्पती वाढल्या. त्यातल्या काही वनस्पती औषधी होत्या. साहजिकच वनस्पतींची पानं, फुलं त्या विहिरीत पडत. वर्षानुवर्षे असंच चालू होतं, परिणामी विहिरीचं सगळं पाणी औषधी बनलं, पण कुणाचंही तिकडं लक्ष नव्हतं !"*

आप्पा सत्यघटना सांगत होते, मी कान देऊन ऐकत होतो. आप्पा पुढं सांगू लागले, *"तीस वर्षांपूर्वी.. १९७० च्या सुमारास एक यात्रेकरू गावात आला. तो रोगी होता, त्याला अनेक व्याधी होत्या. त्याला गावात कुठंही आसरा मिळाला नाही. तो त्या यशोमातेच्या मंदिरात राहिला. मंदिरात राहायचं.. जवळच असलेल्या त्या पडक्या विहिरीच्या पाण्यानं अंघोळ करायची.. तेच पाणी प्यायचं आणि पोटापुरतं मागून खायचं ! असा त्याचा दिनक्रम होता. काही दिवस तो तिथं राहिला आणि पुढच्या प्रवासाला निघून गेला. तीन चार महिन्यांनी तो यात्रेकरू परत आला आणि सर्वांना सांगू लागला.. चमत्कार झाला.. चमत्कार झाला.. यशोमातेच्या जवळ असलेल्या विहिरीच्या पाण्यानं मी अंघोळ केली.. पाणी प्यालो आणि माझे सगळे रोग गेले.. मी पूर्ण बरा झालो ! बघता बघता ही वार्ता पंचक्रोशीत पसरली. लोकं रावगावात येऊन 'ते' पाणी पिऊ लागली.. घेऊन जाऊ लागली.. गुण येऊ लागला ! काही दिवसांत रावगावच्या पाण्याचं महात्म्य सर्वदूर पसरलं. लोकं 'रावगाव' शोधीत येऊ लागली.. काही येवून राहू लागली.. पाण्याचा लाभ घेऊ लागली. त्यात बहुतांश कुष्ठरोगी असत. गुण येत असल्यानं रावगावला येणाऱ्या लोकांचा ओघ वाढला. करमाळा आगार प्रमुखाला बसस्थानकात एका बाजूला खास रावगावसाठी तात्पुरतं स्टँड उभारावं लागलं."*

बोलता बोलता आप्पा थांबले. मी आप्पांकडं बघितलं, ते सदगदीत झाले होते. थोडं थांबून ते सांगू लागले, *"लांबून लांबून लोक येऊ लागले तसे गावातल्या लोकांचे 'भाव' बदलू लागले.. त्यांनी पाणी विकायला सुरुवात केली. कुणी तांब्यानं, कुणी हंड्यानं तर कुणी घागरीनं पाणी विकलं. रोगमुक्त होण्यासाठी रोगी निर्मळ मनानं, निर्मळ 'भाव'नेनं येत.. गावातल्या लोकांनी पाण्याचा 'भाव' केला.. काही महिन्यांनी पाण्याचा गुण येईनासा झाला ! अनेकांना अजूनही वाटतं, गावातल्या लोकांनी पाणी विकलं म्हणून गुण यायचा बंद झाला. पण खरं कारण असं आहे.. पाण्यातले 'औषधी गुणधर्म' संपले म्हणून गुण यायचा बंद झाला ! कारण काहीही असो, या घटनेनंतर रावगाव "पाण्याचं रायगाव" म्हणून प्रसिद्ध झालं."*

*क्रमशः..*

               *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*




 

  

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य