पाणी अडवा.. पाणी जिरवा !

बालसंस्कार परिपाठच्या "पाणी विशेषांक" मध्ये प्रसिद्ध झालेला लेख. दि २२ सप्टेंबर २०२३.

*पाणी अडवा - पाणी जिरवा*
-----------------------------------

*पानी रे पानी, तेरा रंग कैसा?*
*भूखे की 'भूख और प्यास' जैसा !*

  "शोर" चित्रपटातलं हे गाणं पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणारं आहे...
खरं तर,
*पाण्याला रंग नाही, पण पाण्यामुळेच जीवनात 'रंग' आहेत !*
*पाण्याला वास नाही, पण पाण्यामुळेच पृथ्वीतलावर सजीवांचा रहि'वास' आहे !!*
*पाण्याला गंध नाही, पण पाण्यामुळेच सृष्टीत सु'गंध' आहे !!!*

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यातही वस्त्राशिवाय आपण जगू शकतो, निवाऱ्याशिवायही काही काळ जिवंत राहू शकतो पण अन्न, पाण्याशिवाय आपण एक आठवड्यापेक्षा जास्त काळ जगू शकत नाही...
*पाण्यामुळेच अस्तित्व आहे,*
  *पाण्यामुळेच स्पंदन आहे !*
    *पाणीच पृथ्वीवरील अमृत,*
      *पाण्यामुळेच जीवन आहे !!*

शायर श्याम सुंदर अग्रवाल एका ठिकाणी लिहितात..
*सदा हमें समझाए नानी,*
  *नहीं व्यर्थ बहाओ पानी !*
    *हुआ समाप्त अगर धरा से,*
      *मिट जायेगी ये जिंदगानी !!*

खरं आहे...
पाणी म्हणजे जल !
आणि "जल है तो कल है," असं म्हणतात ते काही खोटं नाही, पण *'कल' सुरक्षित करण्यासाठी आपण 'जल' संवर्धन करतो का?*
*हा खरा प्रश्न आहे....*

चला तर मग,
आज आपण आपलं आयुष्य आणि पुढल्या पिढीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी काय केलं पाहिजे, याविषयी थोडंसं चिंतन करूया...

एखाद्या वर्षीचा अपवाद वगळता सुदैवानं आपल्या महाराष्ट्रात दरवर्षी चांगला पाऊस पडतो. काही पाणी जमिनीत मुरतं, थोडंफार पाणी शेततळी, पाझर तलावात साठवलं जातं तर बरचसं पाणी वाहून जातं आणि समुद्राला जाऊन मिळतं. पावसाळ्यात सगळीकडे पाणीच पाणी असतं, पण उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू लागते.

*पाणीटंचाईच्या खऱ्या झळा बसतात त्या खेड्यापाड्यांना !*
*नद्या आटतात तेव्हा गायीगुरांना पाण्याच्या शोधात वणवण भटकावं लागतं. तळी 'तळ' गाठतात तेव्हा माताभगिनींच्या डोळ्यांत पाणी येतं. विहिरीतून हंडाभर पाणी शेंदून काढताना त्यांना जीवघेणी कसरत करावी लागते. नदीत लहानसा खड्डा खोदून वाटीने पाणी भरणारी मुलं पाहिली की पोटात खड्डा पडतो ! चार दिवसांतून एकदा पाण्याचा सरकारी टँकर गावात आल्यावर घाघरभर पाण्यासाठी महिलांची होणारी तारांबळ बघवत नाही.*

उन्हाळ्यात अनेकांना वापराचं पाणीही विकत घ्यावं लागतं, तेव्हा राहून राहून या ओळी आठवतात..
*है बिक रहा बाजार में,*
  *जो था कभी तालाब में !*
*पानी है कितना कीमती,*
  *जा पूछ रेगिस्तान में !!*

हे भयाण वास्तव बदलण्यासाठी शासनातर्फे जलसंधारणाची कामं केली जातात. जलयुक्त शिवार, पाणी अडवा.. पाणी जिरवा या सारख्या योजना राबविल्या जातात.

*मागील काही वर्षांपासून अभिनेते आमिर खान यांनी "पानी फाउंडेशन" च्या माध्यमातून 'वॉटर कप' स्पर्धा आयोजित केल्या. ज्या गावांनी मनापासून या स्पर्धेत भाग घेतला, आणि "एकजुटीनं पेटलं रान.. उधाण आलंया" असं म्हणत ऊन, वाऱ्याची तमा न करता घाम गाळला. माळरानं आणि पडीक जमिनीत झाडं लावली. डोंगर उतारावर तसेच शक्य असेल तिथं चर खोदले आणि वाहून जाणारं पाणी जमिनीत मुरवलं. शोषखड्डे खोदले आणि सांडपाणीही जागच्या जागी जिरवलं... ती सगळी गावं आज पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहेत !*

पण,
शासन असो की पानी फाउंडेशन..
यांच्या जीवावर आपण किती दिवस जगणार आहोत?
दुसऱ्याच्या ओंजळीनं अजून किती दिवस पाणी पिणार आहोत??

*कुणीतरी येईल.. चमत्कार होईल आणि आपल्याला मुबलक पाणी देऊन जाईल या भ्रमातून आपण आता बाहेर पडलं पाहिजे...*

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
*नगरेची रचावी | जलाशये निर्मावी |*
*महावने लावावीत | नाना विधि |*

आपलं भविष्य आपल्यालाच घडवावं लागेल. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी, शेतीच्या बांधावर आणि पडीक जमिनीत झाडे लावावी लागतील आणि ती जगवावी लागतील. ढगातून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अडवावा लागेल आणि तो जमिनीत मुरवावा लागेल. विहिरी, बंद पडलेले बोअरवेल्स यांचं पुनर्भरण करावं लागेल तरच जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल.

पाणी वापराबाबतही जनजागृती व्हायला हवी !
*आपण ग्लासभर पाणी घेतो.. अर्धे पितो आणि अर्धे फेकून देतो !* अनेक बाबतीत आपण पाण्याचा वापर असाच निष्काळजीपणे करतो. पाण्याची नासाडी थांबली पाहिजे.

एके ठिकाणी एक खूप छान वाक्य माझ्या वाचनात आलं, *"पाण्याच्या वापरात कपात करा नाहीतर 'कपात' पाणी मिळेल !"* यातलं गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे.

*पाण्याची बचत ही सुद्धा एक प्रकारे पाण्याची निर्मितीच आहे. खरं तर याबाबत अंगणवाडी आणि शाळांमधूनच "बालसंस्कार" व्हायला हवेत...*

शेवटी एकच सांगावंसं वाटतं..
*"पाणी अडवा.. पाणी जिरवा आणि पाणी वाढवा," ही लोकचळवळ झाली पाहिजे !*

               *श्री राजेंद्र भिमराव गिते*
               *उपशिक्षक,*
               *जि.प.प्राथ. शाळा रस्तापूर*
               *ता. बार्शी जि. सोलापूर*
               *मो.नं -9881131509*



Popular posts from this blog

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य