बब्रु तात्या.. एक लढवय्या नेता !

*बब्रु तात्या.. एक लढवय्या नेता !*


*श्री बब्रुवाहन उत्तरेश्वर काशीद गुरुजी म्हणजेच सर्वांचे.. बब्रु तात्या !*


आदरणीय तात्यासाहेब,

सांगोला तालुक्यात तीन व मोहोळ तालुक्यात पाच वर्षे आपण 'शिक्षण सेवा' केली. १९९८ पासून सलग सव्वीस वर्षे बार्शी तालुक्यात शिक्षक संघाच्या व शिक्षक पतसंस्थेच्या माध्यमातून शिक्षकांची सेवा केली. नियत वयोमानानुसार आज आपण सेवानिवृत्त होत आहात. त्यानिमित्त *संतनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वैराग नगरीतील आपल्या "सेवापूर्ती सन्मान सोहळ्यास" मनःपूर्वक शुभेच्छा !*


म्हणतात ना,

*काम ऐसा करो कि एक पहचान बन जाए,*

*हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए !*

*यहां जिंदगी तो हर कोई काट लेता है,*

लेकिन,

*जिंदगी जियो इस कदर कि मिसाल बन जाए !!*


बब्रु तात्या, आपलं कामही असंच आहे. आजही जेव्हा संघर्ष करण्याची, लढण्याची वेळ येते तेव्हा आपण सर्वांच्या पुढे असता. कारण सर्वांना माहीत आहे *बब्रु तात्या.. नाम ही काफी है !*


खरंच,

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, संभाजीराव थोरात तात्या गटाचा *बार्शी तालुक्याचा आवाज म्हणजे बब्रु तात्या !* गटातटाचं राजकारण बाजूला ठेवून प्रत्येकालाच आपल्या *'जवळचा मित्र' वाटतो तो म्हणजे बब्रु तात्या !!*


आपल्या अडीअडचणी झाकून ठेवून शिक्षकांच्या सुखदुःखात समरस होणारा *'आपला माणूस' म्हणजे बब्रु तात्या !*

आणि,

शिक्षकांच्या न्याय, हक्क व हितासाठी प्रसंगी प्रशासनाला कधी अंगावर तर कधी शिंगावर घेणारा *'लढवय्या नेता' म्हणजे बब्रु तात्या !!*


तात्यासाहेब,

शिक्षकांचे प्रश्न, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण काय नाही केलं???


एका पदाधिकाऱ्याच्या 'बाळ'हट्टामुळे जिल्हा परिषदेनं ड्रेसकोडची सक्ती केली तेव्हा *आपणच शिक्षकांचा आवाज झालात !*


एका अधिकाऱ्यानं शाळेत ब्लेझर वापरण्याचा फतवा काढला तेव्हा *आपणच न्यायालयीन लढा दिलात !!*


आणि,

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मुख्याध्यापकांची पदोन्नती रखडली तेव्हा जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर म. ज. मोरे सरांच्या खांद्याला खांदा लावून *आपणच साखळी उपोषणाचा मार्ग निवडलात !!!*


शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी कधी आक्रोश मोर्चा, कधी मूकमोर्चा, कधी धरणे तर कधी उपोषण अशी आजवर कितीतरी आंदोलनं आपण पुकारली आणि ती तडीस नेली. *कौटुंबिक स्वास्थ्य आणि प्रकृती अस्वास्थ्य बाजूला सारून आपण अहोरात्र शिक्षकांसाठी झटलात, झिजलात आणि लढलात !*


*ना थके कभी पैर,*

*ना कभी हिम्मत हारी है !*

*हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने का,*

*इसलीए अभी भी सफर जारी है !!*


तात्यासाहेब, वयाच्या 58 व्या वर्षीही आपण ज्या जिद्दीनं संघटनेचं काम करता, त्याच उमेदीनं आंदोलनं पुकारता, जितक्या ताकदीनं मोर्चे काढता तितक्याच कणखर मनानं उपोषण करता. ज्या तडफेनं राज्यभरात फिरता त्याच तडफेनं शेतीही करता...

*आता आपण थोडं थांबलं पाहिजे, तब्येतीला जपलं पाहिजे, कुटुंबात रमलं पाहिजे असं आपल्याला नाही का वाटत?* आपल्या नेतृत्वाखाली आता अनेक चांगले कार्यकर्ते तयार झाले आहेत. संघटनेची ध्येय-धोरणे आणि विचार ते नक्कीच पुढं घेऊन जातील. आता आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं, असं अनेकांना वाटतं !


तात्यासाहेब, संघटना म्हणजे दुसरं कुटुंबच ! या दुसऱ्या कुटुंबामुळे आजवर आपल्याला पहिल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देता आला नसेल, आता सेवानिवृत्त झाल्यानंतर नक्की द्या. *निवृत्ती म्हणजे आनंदाची दुसरी आवृत्ती असते. या दुसऱ्या आवृत्तीचा भरभरून आनंद घ्या. शकुंतलेच्या सुंदर वेलीवर उमललेल्या अमर व अजय या दोन गोड, टवटवीत फुलांचा सुगंध तुमच्या अंगणात दरवळलेला आहे. अलगद डोळे मिटून त्या सर्वांना पुन्हा एकदा जवळ घ्या.. मायेनं गोंजारून पाहा. पापण्यांच्या झुल्यांवर त्यांना पुन्हा एकदा झुलवा. जीवनाचं सार्थक झाल्याचं समाधान नक्कीच आपल्याला मिळेल !*


तात्यासाहेब, आपण सरकारी दप्तरातून निवृत्त व्हाल पण आमच्या मनातून नाही ! आपलं शैक्षणिक, सामाजिक कार्य, शिक्षक संघाच्या जडणघडणीतील आपलं योगदान, आपण आजवर केलेली आंदोलनं, आपला लढा आणि आपला संघर्ष शिक्षकांच्या कायम स्मरणात राहील...

*आपल्या पुढील सुखी, संपन्न, आनंदी व आरोग्यदायी आयुष्यासाठी रस्तापूर शाळेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा !*


          *राजेंद्र गिते, बार्शी.*

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२