*सौ राधिका वेदपाठक मॅडम*
*जिथे कर माझे जुळती !*
*मागे वळून पाहताना,*
*आठवणी जाग्या होतात !*
*भूतकाळात रमताना,*
*अलगद डोळे पाणावतात !!*
ज्यांच्या सोज्वळ वागण्याचा आणि प्रेमळ बोलण्याचा आदर्श घ्यावा, ज्यांच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमातून प्रेरणा घ्यावी आणि ज्यांच्या कार्य, कर्तृत्वासमोर आदराने नतमस्तक व्हावे अशा मातृतुल्य, आदरणीय सौ.राधिका कृष्णात वेदपाठक मॅडम ३८ वर्षांची प्रदीर्घ सेवा समर्पित करून आज नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्या...
*त्याबद्दल त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..!*
वेदपाठक मॅडम,
राळेरास शाळेत असताना केंद्रीय मुख्याध्यापक पदाचा कार्यभार आपण यशस्वीपणे सांभाळला. पानगाव नं २ शाळेत सहशिक्षिका म्हणूनही आपण उल्लेखनीय काम केले, पण *आपली कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरली ती पानगाव मुलींच्या शाळेत.. मुख्याध्यापिका म्हणून !*
*हाताची पाचही बोटे एकत्र घट्ट बांधली तर वज्रमूठ बनते आणि मनगटात एकीचे बळ प्राप्त होते.* तशाच प्रकारे आपण आपल्या शाळेतील पाच रणरागिनींना तनाने आणि मनाने एकत्र बांधले. कोरोना काळात सर्व शाळा बंद असताना, याच रणरागिनींनी आपल्याच कुशल नेतृत्वाखाली मैदान गाजवले. ऑनलाईन तास घेतले, शैक्षणिक व्हिडीओ तयार करून यु ट्यूबवर व्हिडीओ अपलोड केले. नारीशक्तीचा आपण कौशल्याने वापर करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवले.
मॅडम, आपल्याच नेतृत्वाखाली शाळा भौतिक सुविधांच्या बाबतीत परिपूर्ण झाली, शाळेचे अंतरंग व बाह्यांग सजले आणि त्यामुळेच *मुख्य कार्यकारी अधिकारी मा दिलिप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतील "स्वच्छ शाळा सुंदर शाळा" या उपक्रमात आपल्या शाळेने बार्शी तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला.*
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे व त्यांच्या कलागुणांना वाव देणे यास आपण नेहमीच प्राधान्य दिले. त्यामुळे नुकत्याच झालेल्या *विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत आपल्या शाळेने 'गीतगायन' स्पर्धेत तिसरा व 'लोकनृत्य' स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला हे कोण विसरेल?*
*मॅडम,*
*घर सांभाळून नोकरी करताना अनेकदा ओढाताण झाली असेल, कामाच्या व्यापात कित्येक वेळा आनंदाचे क्षण झेलता आले नसतील, वेळेअभावी भावनांचे आभाळ पापण्यांवर पेलता आले नसेल...*
पण,
हरकत नाही...
*"सेवानिवृत्ती म्हणजे आनंदाची दुसरी आवृत्ती" !*
*निसटून गेलेले क्षण पुन्हा परत आणता येणार नाहीत, हे जरी खरे असले तरी येणारा प्रत्येक क्षण तुमचा आहे.. त्यांना ओंजळीत अलगद झेलून त्याचा उत्सव नक्कीच करता येईल !*
*मॅडम,*
*आपल्या शाळेतील शिक्षिकांनी आपल्याला जरी आनंदाने निरोप दिला असला, तरी उद्यापासून त्यांना तुमचा सहवास लाभणार नाही, तुमचं मार्गदर्शन मिळणार नाही, याचं दुःख त्यांना शब्दांत कसं व्यक्त करता येईल ?*
असो,
*मॅडम, सेवानिवृत्ती म्हणजे दुसऱ्यासाठी काम करणे सोडून स्वतःसाठी जगणे सुरू करणे होय !*
*यापुढील आपले आयुष्य आनंदाचे, भरभराटीचे, सौख्याचे व आरोग्यदायी जावो !*
*आपल्या शैक्षणिक कार्याचा पानगाव केंद्राला नेहमीच अभिमान वाटत राहील !*
*रस्तापूर शाळेच्या वतीने आपणास सेवापूर्ती निमित्त खूप खूप शुभेच्छा !*
*राजेंद्र गिते, बार्शी.*