*तंबाखुमुक्त शाळा...*

*'तंबाखुमुक्त शाळा'.. शिक्षकांची भूमिका !*


   *हम सबका, यही है सपना |*

    *तंबाखूमुक्त हो, भारत अपना ||*


   भारत हा तरुणांचा देश आहे. तरुणांच्या नेतृत्वामुळे आणि कर्तृवामुळेच देश घडतो. तरुणांची शक्ती हीच राष्ट्राची संपत्ती असते, पण अलीकडच्या काळात हीच राष्ट्राची संपत्ती मित्रांच्या संगतीत आणि मोबाईल मधील गंमतीत मन गुंतवित आहे. चित्रपट आणि जाहिरातींच्या मोहात पडत आहे. दारू, गांजा, सिगारेट आणि तंबाखूच्या डबक्यात सडत आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनात आयुष्य नासवीत आहे.


  तंबाखू.. खरंतर तंबाखू ही अमेरिकेतील एक वनस्पती ! पोर्तुगीजांनी ती भारतात आणली आणि अल्पावधीतच ती भारतीय झाली. सध्या भारतात 10 टक्के क्षेत्रात तंबाखुचे उत्पादन घेतले जाते. तंबाखुचे 'उत्पादन व सेवन' करण्यात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. अंदाजे 2 कोटी लोक तंबाखू आणि विडी उद्योग क्षेत्रात काम करीत आहेत. विविध सर्वेक्षणानुसार देशात 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोक तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत आहेत.

*तंबाखुचे सेवन अनेक प्रकारे केले जाते. तंबाखू चुण्याने मळून खाल्ली जाते. विडी, सिगारेट, चिरुट, हुक्का यांतून ओढली जाते. पान, मावा आणि गुटख्यातून चघळली जाते. तपकीर, मशेरीमध्येही ती सर्रास  वापरली जाते.* लोक दारूच्या व्यसनाला वाईट मानतात, त्यामानाने तंबाखू समाजमान्य आहे. प्रत्यक्षात दोन्ही व्यसनातून शरीराची आणि आरोग्याची नासाडीच होते. तंबाखू, सिगारेट कमी खर्चात सगळीकडे सहज उपलब्ध होते. सेवनही इतके उघडपणे केले जाते, की ते 'वाईट' आहे, असे लहान मुलांनाही वाटत नाही. त्यामुळे कमी वयातील मुलेही विडी, सिगारेट किंवा तंबाखूच्या सहज आहारी जातात. हॉटेल्स, पब, बार, हुक्का पार्लर्स आणि रेव्ह पार्ट्यांत गांजा, चरस हुंगणाऱ्या आणि नशेत झिंगणाऱ्या तरुणाईचे चित्र खरोखरच वेदनादायक आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने शरीरावर आणि मनावर अनेक दुष्परिणाम होतात. चघळायच्या तंबाखुमुळे तोंडाचा, जिभेचा, घशाचा कॅन्सर होतो. धुम्रपानांमुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. 'तंबाखू' हेच कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणाचे मुख्य कारण आहे. कॅन्सर, हृदयरोग, मुखरोग, गँगरीन, नपुंसकता, गर्भपात तसेच पोटाच्या, फुफ्फुसाच्या आणि किडनीच्या आजाराने देशात लाखो लोक मरत आहेत. तरीही तंबाखूचा मोह सुटता सुटत नाही. याचं कारण तंबाखुमध्ये असलेलं निकोटीन हे रसायन ! तंबाखू खाल्ल्याने हे रसायन वेगाने शरीरात मिसळते. धुम्रपानांमुळे ते रक्तात मिसळते. निकोटीन मानवाच्या लहान मेंदूवर परिणाम करते, आणि त्याला सवयीत बांधून ठेवते. तंबाखुमधील निकोटीन रक्तप्रवाहात मिसळले की शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची भावना निर्माण होते. हलकीशी कैफ चढते, तात्पुरती नशा येते. ही नशा पुन्हा मिळविण्यासाठी पुन्हा तंबाखुचे सेवन केले जाते. सवय लागते.. यातूनच व्यसन जडते.


*'तंबाखूचे व्यसन म्हणजे जिवंत मरण,'*

   *'स्वतःच स्वतःसाठी रचलेलं सरण.*


   तंबाखूच्या पॅकिंगवर *'तंबाखुमुळे कॅन्सर होतो.'* सिगारेटच्या पॉकेटवर *'Cigarette smoking is injuries to health.'* असे ठळकपणे लिहिलेले असते. सगळे वाचतात, तरीही तंबाखू घेतात.. खातात.. बिडी, सिगारेट घेतात.. ओढतात.. आणि मरणाच्या अधिकाधिक जवळ जातात. "कळतंय पण वळत नाही", अशीच काहीशी अवस्था आहे !

*तंबाखूजन्य पदार्थांची नशा,*

  *सुंदर जीवनाची करते दुर्दशा !* असेच म्हणावे लागेल...


*महाराष्ट्रात 'टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल परळ, मुंबई' आणि 'नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल बार्शी, जिल्हा सोलापूर' येथे कॅन्सरवर अत्यल्प दरात उपचार केले जातात.*


31 मे हा दिवस 'तंबाखू सेवन विरोधी दिन' म्हणून पळाला जातो. *प्रबळ इच्छाशक्ती, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि काही घरगुती उपाय केल्यास तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून दूर जाता येईल.*


   बालवयातच मुलांवर चांगले संस्कार व्हावेत. विद्यार्थ्यांमध्ये जागृती यावी. गावांगावात जनजागृती व्हावी. युवा पिढी तंबाखुपासून दूर राहावी. राज्यातील शैक्षणिक संस्था आणि त्यांचे परिसर तंबाखुमुक्त व्हावेत, यासाठी महाराष्ट्र राज्याचा शालेय शिक्षण विभाग 'तंबाखुमुक्त शाळा अभियान' राबवित आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाला 'सलाम मुंबई फाउंडेशन' ही संस्था सहकार्य करीत आहे.


   'तंबाखुमुक्त शाळा' करण्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणून शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा आयोजित केली जाते. शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते, आणि निकष पूर्ण करणाऱ्या शाळेला 'तंबाखुमुक्त शाळा' म्हणून घोषित केले जाते.


   विद्यार्थ्यांना घडविणारे, समाजाला दिशा देणारे आणि राष्ट्रीय कार्यात नेहमी अग्रभागी असणारे शिक्षकच 'तंबाखुमुक्त शाळा' करु शकतात. निरोगी, सुदृढ, सशक्त, व्यसनमुक्त आणि बलशाली भारत घडवू शकतात.


*घरांघरात स्वच्छतेचा,*

  *मंत्र उच्चारला जावा..!*

   *शाळांमधून आरोग्याचा*

     *पाढा वाचला जावा..!!*


*तंबाखूमुक्तीचा धडा,*

  *पुन्हा गिरविला जावा..!*

   *व्यसनांवर वरवंटा,*

     *रोज फिरविला जावा..!!*


   आता शिक्षकांना जबाबदारी घ्यावी लागेल, तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी मनापासून योगदान द्यावे लागेल. तसेच निरोगी, व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील...


  शिक्षकांनी शाळेत 'तंबाखू नियंत्रण समिती' ची स्थापना करावी. ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, तंटामुक्ती समिती तसेच विविध समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून गावात जनजागृती करावी. तंबाखूचे दुष्परिणाम दर्शविणारे पोस्टर्स, संदेश घेऊन घोषणा देत गावातून रॅली काढावी. आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स किंवा तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करावीत. शालेय स्तरावर विद्यार्थी किंवा हौशी कलाकारांच्या मदतीने तंबाखूविरोधी पथनाट्ये सादर करावीत. शाळेत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित कराव्यात. शाळेच्या 200 मीटर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विकणे, सेवन करणे, धूम्रपान करणे कायद्याने गुन्हा आहे, असे फलक लावावेत. तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रत शाळेत ठेवावी. शाळेत तसेच शाळेच्या परिसरात 'तंबाखुचे दुष्परिणाम' दाखविणारे पोस्टर्स लावावेत. तंबाखू विरोधी संदेश शालेय साहित्य, रजिस्टर्सवर डकवावेत. शाळेच्या आरोग्य उपक्रमात तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा समावेश करावा.


   दर तीन महिन्याला तंबाखू नियंत्रण समितीची आढावा बैठक घ्यावी. व्यसन सोडणाऱ्या, व्यसन सोडण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या, तंबाखुमुक्त शाळा करण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक, पालक, समाजसेवक आणि विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करावा. तंबाखू नियंत्रणासाठी नियुक्त केलेल्या राज्य सल्लागार प्रतिनिधी, वैद्यकीय अधिकारी यांची वेळोवेळी मदत घ्यावी. मार्गदर्शन घ्यावे. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ *'तंबाखुमुक्त शाळा'* असा फलक लावावा.


*तंबाखू सोडा, धूम्रपान सोडा,*

   *शुद्ध, मोकळा श्वास घ्या..!*

     *व्यसन सोडा, आरोग्य जोडा,*

       *सुखी जीवनाचा ध्यास घ्या..!!*


  *तंबाखूच्या सेवनाने शरीर खंगते, मन भंगते परिणामी जीवन दुभंगते, हे विद्यार्थी, पालक आणि समाजाला पटवून देऊन, तंबाखूमुक्त शाळा व सुदृढ, निरोगी राष्ट्र घडविण्यासाठी शिक्षकांनाच आघाडीवर राहून प्रयत्न करावे लागतील...*


         ■■■■■


नाव - श्री राजेंद्र भिमराव गिते

हुद्दा - उपशिक्षक


पत्ता - जि.प.प्राथ.शाळा रस्तापूर

      पो.सुर्डी ता.बार्शी जि. सोलापूर


मो.नं -9881131509


Email - rajendragite8891@gmail.com


        ■■■■■


Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य